Shiv Sena Melawa | नागपुरातील संजय राऊतांच्या सभेतच वीज चोरी! आता म्हणतात, पक्षांतर्गत चौकशी करू
मंचाच्या समोरील बाजूस बसलेल्या श्रोत्यांच्या उजवीकडील खांबावरून ही तशाच पद्धतीने तार टाकून वीज चोरल्याचे दिसून आले. त्यामुळे विजेच्या टंचाईचे नावाखाली राज्याची जनता भारनियमनाच्या संकटाला सामोरे जात असताना राजकीय पक्षाना वीज संकटाशी देणंघेणं नाही का असा प्रश्न निर्माण झालाय.
नागपूर : महाविकास आघाडी सरकारचा किल्ला जोरात लढवणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची काल रात्री नागपुरात जाहीर सभा झाली. दक्षिण नागपूर (South Nagpur) परिसरात गजानननगर याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणातून आगामी नागपूर महापालिका (Nagpur Municipal Corporation) निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच सभेसाठी आयोजकांनी मंचाच्या डाव्या बाजूला असलेल्या खांबावरच्या विजेच्या तारांवर तार ( आकोडे ) टाकून वीज चोरल्याचे दिसून आले. तसेच मंचाच्या समोरील बाजूस बसलेल्या श्रोत्यांच्या उजवीकडील खांबावरून ही तशाच पद्धतीने तार टाकून वीज चोरल्याचे दिसून आले. त्यामुळे विजेच्या टंचाईचे नावाखाली राज्याची जनता भारनियमनाच्या संकटाला सामोरे जात असताना राजकीय पक्षाना वीज संकटाशी देणंघेणं नाही का असा प्रश्न निर्माण झालाय.
पक्षांतर्गत चौकशी करण्याचे आश्वासन
या सभेत संजय राऊत म्हणाले, मुंबईत बसत असलो, तर नागपूरकडं विशेष लक्ष असतं. नागपूरकर आता मुंबईकर झालेत. त्यांच्या प्रापर्टीस मुंबईत आहेत. त्यांना आता मुंबई सोडायची नाही. पुढल्याकाळात नागपूर मनपाचा रोज एक भ्रष्टाचार काढू. अशी प्रकरण आपल्याकडं आली आहेत. भाजपवाल्यांच्या मागे आता ईडी लागली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राचे पोलीस यासाठी सक्षम आहेत. नागपूर मनपा ज्यांनी लुटली. ज्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांना तुरुंगात जावं लागेल. नागपूरकरांची अनेक वर्षे फसवणूक झाली आहे. त्या फसवणुकीच्या विरुद्ध आपण लढाई केली पाहिजे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. पण, त्यांच्याच याच प्रचारसभेत वीज चोरी झाल्याचं लक्षात येताच याची पक्षांतर्गत चौकशी नेमू असं सांगून त्यांनी या प्रकरणावर सावरासावर केली.
मला माहिती मिळाली
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस नागपूरचे सुपुत्र आहेत. ते म्हणाले, नागपूरच्या मातीतून आम्हाला सद्बुध्दी मिळावी. तर तुम्हाला का नाही मिळाली. तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर आज चित्र काही वेगळे असते, असंही राऊत म्हणाले. वीज चोरीवर राऊत म्हणाले, आमच्या कार्यक्रमात वीज चोरी झाली. याची मला माहिती मिळाली. त्यावर आम्ही चौकशी करू.