नागपूर : पूर्व नागपुरातील ट्रान्सपोर्ट प्लाझा येथे गुन्हे शाखेनं छापा टाकून सुपारी जप्त केली. या सुपारीची किंमत एक कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. राजेश पाहुजा या व्यापाऱ्याच्या गोदामात 120 पोती प्रतिबंधित सुपारी सापडली. शहरात आणखी काही व्यापाऱ्यांकडे प्रतिबंधित सुपारी लपवून ठेवल्याची माहिती आहे.
नागपूर पोलिसांनी दिल्लीवरून आलेल्या एका ट्रकला संशयावरून थांबविले. त्यामध्ये 350 पोती असल्याची माहिती मिळाली. चौकशीत चालकानं मऊ राणीपूर ट्रान्सपोर्टचे अनुप नगरिया यांचा असल्याचं सांगितलं. नगरिया यांनी कागदपत्र दाखवून सुपारी दिल्लीवरून आल्याचं सांगितलं. दरम्यान, राजेश पाहुजा नावाच्या व्यापाऱ्याच्या गोदामात प्रतिबंधित सुपारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस चौकशीसाठी जाताच मजूर पळून गेले. त्याठिकाणी 120 पोती सुपारी सापडली.
पोलीस इतर ठिकाणी धाडी टाकतील, अशी शंका आल्यानं कापसी खुर्दच्या बीअर बारजवळ असलेल्या गोदामातून एक कोटींची सुपारी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. एफडीएच्या पथकानं अनुप नगरिया आणि राजेश पाहुजा यांच्या गोदामातून मिळालेल्या सुपारीची तपासणी केली. एफडीएनं गोदाम सिल करून सुपारीच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली. नगरिया आणि पाहुजा यांच्याकडील जीएसटी आणि इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये त्रृटी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
तीन वर्षांपूर्वी ट्रान्सपोर्ट प्लाझा परिसरात अनुप नगरियाची सुपारी पकडली होती. जप्त करण्यात आलेली सुपारी एका व्यापाऱ्यासाठी बोलावण्यात आली होती. या व्यापाऱ्याविरुद्ध अनेकदा कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यातही चेन्नई येथे मोठ्या प्रमाणात सुपारी आली होती. त्यातील काही सुपारी नागपूरला आली आहे. याप्रकरणी तपास केल्यास मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.