Nagpur Shiv Sena : उद्धव ठाकरेंच्या समर्थनात नागपुरात 2 ठिकाणी आंदोलनं, रेशीमबाग चौकात शिवसैनिकांनी शिंदेंचा जाळला पुतळा
नागपुरात शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात रेशीमबाग येथील कार्यालयासमोर एकत्रित येत आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला. रेशिमबाग चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक सहभागी झाले होते.
नागपूर : राज्यात शिवसेनेत दोन गट पडलेत. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीत ( Guwahati) 40 आमदारांना घेऊन गेलेत. यामुळं सत्तासंघर्ष सुरू आहे. नागपुरात एकनाथ शिंदे यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला. उद्धव ठाकरे यांचं समर्थन करण्यात आलं. काल एकानं एकनाथ शिंदेंचं समर्थन केलं होतं. शहरात फलक लावले होते. ते फलक युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले. आज पुन्हा शहरात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात आली. पण, दोन ठिकाणी दोन आंदोलनं झाल्यानं शहरातही शिवसेनेचे दोन गट आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. एकाच दिवशी शिवसैनिकांची दोन वेगवेगळ्या कार्यालयात आंदोलन झालीत. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये गटबाजी सुरू आहे का असा प्रश्नसुद्धा उपस्थित व्हायला लागला. किशोर कुमेरिया (Kishore Kumeria) यांच्या नेतृत्वात रेशीमबागेत आंदोलन झालं. तर नागपूर शिवसेना कार्यालयासमोर नितीन तिवारी (Nitin Tiwari) यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं.
गद्दारांना माफी नाही म्हणत जाळला पुतळा
नागपुरात शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात रेशीमबाग येथील कार्यालयासमोर एकत्रित येत आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला. रेशिमबाग चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक सहभागी झाले होते. या शिवसैनिकांनी गद्दारांना माफी नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांचा पुतळासुद्धा जाळला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकत्रित आले होते. या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना नेते किशोर कुमेरिया यांनी केलं.
एकनाथ शिंदेंच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर
शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनात तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली. नागपूरच्या शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांनी आधी मीटिंग घेतली. त्यानंतर कार्यालयाच्या बाहेर येत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना गद्दारांना सोडणार नाही. संपूर्ण शिवसेना ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. सोबत राहणार अशा प्रकारच्या जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना कार्यालयासमोरच आंदोलन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी केलं.