नागपूर जिल्ह्यात आज पल्स पोलिओ मोहीम, किती बालकांचे होणार लसीकरण?
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 1 लाख 93 हजार 350 बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांनी दिली.
![नागपूर जिल्ह्यात आज पल्स पोलिओ मोहीम, किती बालकांचे होणार लसीकरण? नागपूर जिल्ह्यात आज पल्स पोलिओ मोहीम, किती बालकांचे होणार लसीकरण?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/27110159/polio.jpg?w=1280)
नागपूर : पल्स पोलिओ लसीकरणाचा (Pulse Polio Vaccination) वयोगट शून्य ते पाच वर्षाचा आहे. या बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात एकूण 2 हजार 702 लसीकरण केंद्र आहेत. यासाठी 5 हजार 557 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी (All Medical Officers in the District ), प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका दवाखाने, महापालिका येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरावर एक दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. गावपातळीवर आरोग्य सेवक, सेविका आशा स्वयंसेविका या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मुबलक लससाठा प्राथमिक आरोग्य केंद्र ( Primary Health Center), ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे.
जिल्ह्यात 136 मोबाईल टीम सज्ज
27 फेब्रुवारीला होणाऱ्या लसीकरण मोहिमेतून ग्रामीण भागात सुटलेल्या बालकांना 28 फेब्रुवारीपासून 3 दिवस व शहरी भागात सलग 5 दिवस घरोघरी जावून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 215 ट्रांझिट टीमद्वारे बस स्टँड, रेल्वेस्टेशन, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी मोहीम राबविली जाईल. सोबतच 136 मोबाईल टीमद्वारे कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्यांची मुले यांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत.
शून्य ते पाच वर्षे वयोगटातील लाभार्थी
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लसीकरणासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन केले जाईल. सर्व बुथवर व आयपीपीआय मोहीम राबविताना नियमांचे पालन करण्यात येणार आहे. शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांना यापूर्वी पोलिओ डोस दिला जाईल. या मोहिमेमध्ये पोलिओ लसीकरण करून घ्यावे. मोहीम शंभरटक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांनी केले आहे.