रेकी करणाऱ्या रईसला चौकशीसाठी नागपुरात आणणार!; आणखी चार जण पकडले गेले?
नागपुरात संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या रईसला काश्मीरमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्याच्या अन्य चार साथीदारांनाही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर : नागपुरातील संघ मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात होता आत्मघाती हल्ल्याचा डाव असल्याची माहिती पुढं आलीय. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून नागपुरातील संघ मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी प्रकरणात ही माहिती पुढे आलीय.
रईसचा तीन दिवस होता मुक्काम
रेकी करणारा जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख याला काही दिवसांपूर्वी श्रीनगर येथे सुरक्षा दलाकडून अटक केलीय. या रईसनं नागपुरात तीन दिवस मुक्काम ठोकून रेकी केली होती. या रेकीनंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून नागपुरात आत्मघाती हल्ल्याचा डाव होता.
अटकेतील आरोपींकडून धक्कादायक खुलासे
जैश ए मोहम्मदचा कमांडर असलेला उमर याने त्याच्या हस्तकाला शहरात पाठविले होते. त्याने शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणाची रेकी केली. नागपूर शहरात एक व्यक्ती रईसला मदत करणार होता. असे उमर याने त्याला सांगितले होते. त्याचा शोध पोलिस घेत आहे. दरम्यान, हा व्यक्ती पोलिसांच्या तपासात अधोरेखित झाल्याचेही सांगितले जात आहे. हा व्यक्ती टेक्नोसॅव्ही असल्यामुळे त्याला यातील ज्ञान आहे. त्याच्याकडे अनेक सीमकार्ड असावे, असाही अंदाज लावला जात आहे. दरम्यान, उमर याने दिल्लीमध्ये देखील रेकी केल्याचे पुढे आले आहे. अटकेत असलेल्या आरोपींनी यासंदर्भात धक्कादायक खुलासे केल्याचे सांगण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
नागपुरात भेटणारा बंदा कोण?
जैश-ए मोहम्मदने नागपूरसह दिल्लीतही रेकी केल्याची माहिती पुढे आली. रईसची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी श्रीनगरला जाऊन आतापर्यंत सुमारे पन्नास जणांची चौकशी करण्यात आली. रईस जिथं थांबला त्याच्या चालक, मालक, वेटरला ताब्यात घेण्यात आले. ज्या वाहनांची त्याने वापर केला त्यांचाही शोध घेतला जात आहे. नागपुरात त्याला कोणता बंदा भेटणार होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शहरात रेकी करणारा रईस अहमद याला कुणी मदत करणार होता, तोदेखील लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची चिन्हे दिसून येत आहे.