Nagpur Climate | पूर्व विदर्भात पावसाची शक्यता, उन्हाच्या लाहीलाहीपासून होणार सुटका? 24 तासांत पाऊस
पूर्व विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज रात्री पाऊस पडेल. शिवाय उद्याही काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पावसामुळं वातावरणात थोडासा बदल होईल.
नागपूर : असानी चक्रीवादळाचा (Hurricane Asani) विदर्भावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. काही भागात पावसाची शक्यता नागपूर हवामान विभागानं व्यक्त केली आहे. असानी चक्रीवादळ हा सकाळपर्यंत तीव्र होता. तो आता कमी होत आहे. याची वाटचाल सुरू असून तो आंध्रप्रदेशपर्यंत पोहचला आहे. मात्र तो आता पुन्हा बंगालच्या खाडीकडे (Bay of Bengal) वळणार आहे. त्याचा परिणाम कमी प्रमाणात विदर्भावर होणार आहे. रात्री आणि उद्यापर्यंत चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया, नागपूर या भागात पावसाची शक्यता आहे. रात्रीपासून ढगाळ वातावरण बनेल. 24 तासांत पाऊस येईल. विदर्भात वाढलेल्या तापमानात 2 अंश सेल्सियसपर्यंत कमी होईल. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळेल. मात्र त्या नंतर तापमानात वाढ होईल आणि उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान विभागानं (Meteorological Department) व्यक्त केला आहे.
असानी चक्रीवादळाचा परिणाम
असानी चक्रीवादळ आंध्रात पोहचला आहे. आज त्याचा काही परिणाम विदर्भावरही जाणवणार आहे. पूर्व विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज रात्री पाऊस पडेल. शिवाय उद्याही काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पावसामुळं वातावरणात थोडासा बदल होईल. तापमानात घट होईल. त्यामुळं नागरिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. परंतु, पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
ढगाळ वातावरण
सध्या विदर्भातील बऱ्यात भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं पावसाच्या सरी काही भागात कोसळतील. ज्या भागात पाऊस कोसळेल, त्या भागातील तापमानात किंचित घट होईल. शिवाय पावसामुळं पुन्हा वातावरणात गारवा येईल. पण, ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. दोन दिवसांनंतर पुन्हा उन्हाची लाहीलाही सुरू होईल. उन्हाचा पारा वाढेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.