Nagpur Ration रेशनच्या धान्याची काळाबाजारी, 175 पोती धान्य जप्त
पोलिसांनी वसीमच्या घरातून 175 पोती जप्त केली. वसीम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तहसील, लकडगंज, शांतीनगर पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
नागपूर : शांतीनगर पोलिसांनी धान्याची काळाबाजारी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. कुख्यात आरोपीच्या घरातून 175 पोती धान्य जप्त केले. शांतीनगर पोलिसांनी कुख्यात वसीम चिराच्या घरी छापा टाकला. पोलिसांनी वसीमच्या घरातून 175 पोती जप्त केली. वसीम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तहसील, लकडगंज, शांतीनगर पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
वसीम चिराच्या घरी छापा
नागपूरच्या शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास असणारा कुख्यात गुन्हेगार वसीम चिरा हा धान्याची काळाबाजारी करतो. त्याच्या घरी धान्याचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून धान्याची 175 पोती जप्त केली. गेल्या काही दिवसापासून शहरात धान्याचा मोठा काळाबाजार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरीच्या मदतीने त्याची माहिती मिळवली. त्यात वसीम चिराच्या घरातून हे सुरू असल्याची माहिती समोर आली.
चेतन मदानविरोधात गुन्हा
दुसऱ्या एका प्रकरणात रेशन माफिया चेतन मदानविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तीन नोव्हेंबरला परिमंडळ पाचचे उपायुक्त यांच्या पथकाला रेशनचे धान्य घेऊन जाणारा एक ट्रक दिसला. त्याला अडवून कळमन्याच्या ठाणेदारांना माहिती देण्यात आली. हे लाखो रुपये किमतीचे धान्य रेशनचे असावे असं वाटत होते. परंतु, पोलिसांनी चौकशी केली असता चेतन मदानचे नाव समोर आले. पोलिसांनी मदानला चौकशीसाठी बोलावले होते. मदानची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. गुन्हा दाखल होताच मदान पसार झाला.
रेशन धान्याची साखळी
रेशनचे धान्य गरिबांना दिले जाते. परंतु, काही जणांना नियमानुसार रेशन मिळत नाही. एका युनिटचे पाच किलो धान्य दिले जातात. पण, सहा युनिट असतील, तर तीस किलो धान्य मिळणे अपेक्षित असते. परंतु, सहा युनिटवर वीस किलो धान्य देऊन गरिबांची बोळवण केली जाते. उर्वरित १० किलो धान्य काळ्या बाजारात विकले जाते. एखाद्या रेशन दुकानदाराकडे १०० ग्राहक असतील, तर तो त्यातील काही जणांकडून अशी लुबाडणूक करतो. जे ओरडतात, त्यांना धान्य योग्य पद्धतीनं दिले जाते. पण, गुपचूप बसणाऱ्यांची पिळवणूक केली जाते. हेच काळाबाजारातील धान्य चढ्या भावानं विकून पुन्हा रेशनच्या दुकानात येते. अशी ही चैन आहे. ही सारी चैन तोडून काढणे हे अन्न पुरवठा अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे.