नागपूर : फक्त एक दिवस महिलांचा साजरा करून चालणार नाही. राज्यात वर्षभरात महिलांवरील अत्याचारात (Atrocities on Women) मोठी वाढ झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना घडतात. कोविड सेंटरमध्येही महिलांवर बलात्कार झाले. गडचिरोलीत चित्रपटात काम देतो म्हणून अनेक मुलींना पळवून नेले. राज्यातील अनेक जिल्हयात महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांचा पाढा भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP Leader Chitra Wagh) यांनी वाचला. नागपुरात एमडी ड्रग्ज देत दोन दिवस मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या (International Women’s Day) पूर्वसंध्येला मुंबईत एका महिलेला अत्याचाराचा गुन्हा दाखल प्रकरणात तीस लाखांची लाच मागितली. काही ठिकाणी पोलीस महिलांच्या जीवावर उठलेत, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला.
राज्यात वसूल करणारे, बलात्कार करणारे, भूखंड हडप करणाऱ्यांना संरक्षण आहे. महिलांना संरक्षण नाही, असा तीव्र आक्षेप चित्रा वाघ यांनी नोंदवला. संजय राठोड प्रकरणाला दोन वर्षे झाली. साधी एफआयआर नाही. पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यावर 16 फेब्रुवारीला गुन्हा दाखल होतो. 21 फेब्रुवारीला त्याला जामीन कसा मिळतो. हे सरकार गोरगरिबांसाठी नाही. महिलांचा आवाज दाबायचं काम होतंय. औरंगाबाद येथील सेनेच्या आमदारावर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हायला हवा होता. सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचं काम पीआयकडून होतोय. मुख्यमंत्री यांनी कुणाच्या जीवावर बेस्ट सीएमचा अवार्ड मिळाला. तुम्ही तर घरात होतात. या आशा वर्कर्सच्या जीवावर तुम्हाला हा अवार्ड मिळवला. गुलाबराव पाटलाने माफी मागितली आणि मुख्यमंत्र्यांनी माफी देऊन पण टाकली, हे कसं काय, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष अधिवेशनाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी अतिशय निर्लज्जपणे ही मागणी नाकारली. जी वाक्य बोलली नाही ते वाक्य आमचे नेते आशिष शेलार यांना चिटकवण्यात आलं. गुलाबराव पाटील राज्याचा पाटील आहे. त्याने हेमा मालिनी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे नाही का?, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीचा अशोक गावडे हा हरामखोर माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत बोलतो. नवीन गोष्टी करताना जुन्या गोष्टीचा विसर पडतोय. हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता पिसूड्डे यांच्या परिवाराला दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण केलं नाही. थोडी लाज असेल तर गरीब आशा वर्कसचे पैसे आज द्या, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.