मुंबई : राज्यातील आरोग्य सेवा परीक्षा (Healthcare Examination) व म्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परीक्षा पेपर फुटले. त्यामुळं शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले. या परीक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या. त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता. अशा संस्थांना ब्लॅकलिस्ट करावे. शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत (in the Legislative Assembly) प्रश्नोत्तराच्या तासात भाग घेत नाना पटोले म्हणाले की, आरोग्य सेवा व म्हाडाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याचे निदर्शनास आले. ते खरे आहे का, असा प्रश्न विचारत शासनाच्या विविध विभागातील भरती प्रक्रियेच्या परीक्षा खाजगी संस्थेमार्फत राबवण्यात येतात. त्यामुळं पेपर फुटीचे प्रमाण वाढले आहे. या पेपर फुटीमुळे उमेदवारांचे मोठे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी शासनाची पदभरती शासनामार्फत राबिवल्या जाव्यात याबाबत काही कार्यवाही झाली आहे का, असे प्रश्न विचारण्यात आले.
या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाची 24 ऑक्टोबर 2021 व 31 ऑक्टोबर 2021 रोजी परीक्षा झाली. परीक्षेनंतर पेपर फुटल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पोलीस तपास सुरू आहे. पेपरफुटी झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच गृहनिर्माण विभागाकडून 12 डिसेंबर 2021 रोजी म्हाडा प्राधिकरणातील रिक्त संवर्गाची पहिल्या टप्प्यातील ऑफलाईन परीक्षा होणार होती. परंतु परीक्षा घेण्यासाठी निश्चित केलेल्या कंपनीकडून सरळसेवा भरती परीक्षेबाबत गोपनियतेचा भंग झाला. त्यामुळं कंपनी संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या परीक्षा 31 जानेवारी 2022 ते 9 फेब्रुवारी 2022 या कालावधीत टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत. पेपरफुटीमुळे उमेदवारांचे होणारे नुकसान लक्षात घेत शासनाने ओएमआर व्हेंडर कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय 18 जानेवारी 2022 रोजी निर्गमित केलाय. यापुढील परीक्षा या टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल यांच्यामार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.