नागपूर : संपूर्ण देशात फक्त नागपुरातच साजरा होणारा मारबत उत्सव यंदा कोरोनाच्या निर्बंधांमुळे साध्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे. विदर्भ आणि नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने उत्सवावर निर्बंध लादले गेले आहेत. या उत्सवाला 141 वर्षांची परंपरा आहे. परंतु कोरोनाच्या दहशतीत उत्सव साजरे करण्यावर शासन प्रशासनाने निर्बंध लादले आहेत.
पोळ्याच्या पाडव्याला साजरा होणाऱ्या या मारबत उत्सवाला 141 वर्षांची परंपरा आहे. काळी आणि पिवळी मारबतीची म्हणजे प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून ती शहराच्या विविध भागातून काढली जाते. ही मिरवणूक बघण्यासाठी नागपूरकर मोठी गर्दी करतात.
नागपूरकर राजे भोसले यांच्या काळात त्यांच्या घराण्यातील बाकाबाई इंग्रजांना फितूर झाली होती. त्यामुळं भोसलेंचा पराभव झाला होता. तिच्या निषेधार्त काळी मारबत काढली जाते. तर समृद्धी राहावी यासाठी पिवळी मारबत काढली जाते. या मारबतीची नागरिक पूजा करतात, नवस बोलतात. मिरवणुकीनंतर दोन्ही मारबतीचं दहन केलं जातं. यंदा मात्र कोरोनामुळं मारबत उत्सवावर निर्बंध घातले आहेत.
विदर्भात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप सुरु झाला आहे. आठवड्भरापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चालू आठवड्याच्या संख्येवरुन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळतायत. त्यामुळे नागपूरमध्ये पुढील तीन दिवसांत शासन प्रशासन पुन्हा एकदा निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नागपूर जिल्हयात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तर विदर्भात गेल्या सहा दिवसांत 217 नवीन कोरोना रुग्णांची भर पडलीय. गेल्या तीन दिवसांपासून नागपूर जिल्हयात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. नागपूर जिल्हयात गेल्या तीन दिवसांत 30 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे विदर्भात कोरोना मृत्यूचं प्रमाण 1.90 टक्क्यांवर स्थिर आहे.
नागपुरात येत्या तीन दिवसात लॉकडाऊनचे अधिक कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. हे निर्बंध लावताना रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कमी करण्यात येणार आहे. तसेच विकेंडला संपूर्ण लॉकडाऊनही लावण्यात येणार असल्याचं सूतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी संख्येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या डबल अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
“आपण सारखं म्हणतो दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार. आता तिसऱ्या लाटेने आपल्या जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागणार आहेत. हे निर्बंध येत्या दोन तीन दिवसात लावण्यात येतील. निर्बंध लावण्यापूर्वी लोकांशी चर्चा करण्यात येईल. चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा करू. हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करू आणि मीडियाशीही चर्चा करून सर्वांची मते जाणून घेऊन नंतर निर्णय घेऊ. मात्र, येत्या तीन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.
(restriction on marbat utsav maharashtra Nagpur Over Corona patient Incresing Day By Day)
हे ही वाचा :
विदर्भात पुन्हा कोरोनाचा प्रकोप, नागपूरमध्येही रुग्ण वाढले, शेकडो खाटा राखीव, लॉकडाऊन अटळ
VIDEO: नागपुरात तीन दिवसानंतर लॉकडाऊन अटळ?, कसे असतील निर्बंध?; वाचा सविस्तर
VIDEO: नागपूर पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? नितीन राऊतांचं मोठं वक्तव्य, तिसऱ्या लाटेची भीती?