Nagpur Corona धोका वाढला, लसीकरणही रेकॉर्डब्रेक, एकाच दिवशी तब्बल 76 हजार लोकांनी घेतली लस
एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 76 हजार लोकांनी लस घेतली. नागपूर शहराने आतापर्यंत 30 लाख लसीकरण करण्याचा टप्पा पार केला. पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
नागपूर : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता नागरिक सतर्क झाले आहे. जिल्ह्यात काल रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाले. एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 76 हजार लोकांनी लस घेतली. नागपूर शहराने आतापर्यंत 30 लाख लसीकरण करण्याचा टप्पा पार केला. पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
कोरोना संसर्गाच्या बचावासाठी नागपूर शहरामध्ये मनपाद्वारे लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील जास्तीत-जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाने 30 लाख डोजचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत शहरात 30 लाख 60 हजार कोव्हिड लसीकरणाचे डोज पूर्ण झाले आहेत.
शहरात 30.60 लाख डोजेस पूर्ण
मनपातर्फे शहरात 150 वर लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 18 वर्षावरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. नागपुरात लसीकरणासाठी 19.73 लाख पात्र नागरिक आहेत. या मधून 19 लाखाहून अधिक पहिला आणि 11 लाखांच्यावर दुसरा डोज देण्यात आला आहे. शहरात पहिला आणि दुसरा डोज मिळून 30.60 लाख डोजेस पूर्ण झाले आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
दोन डोज घेणाऱ्यांनाच गोरेवाड्यात प्रवेश
गोरेवाडा प्रकल्प अंतर्गत बाळासाहेब ठाकरे, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, जंगल ड्राईव्ह (सफारी), बायोपार्क, नेचर ट्रेल येथे प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना लसीकरणाच्या दोन मात्रा घेणे गरजेचे आहे. सदर ठिकाणी प्रवेशाकरिता दोन मात्रांचे लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहील. लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्या नसल्यास पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येईल. पर्यटकांनी कोरोना विषाणूने (कोविड-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक व प्रतिबंधात्मक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पी. बी. पंचभाई यांनी कळविले आहे.
हर घर दस्तकला प्रतिसाद
परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, दिव्यांग, भिक्षेकरू आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड सुद्धा नाही अशा नागरिकांना सुद्धा मनपातर्फे लस देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागानुसार आता हर घर दस्तक मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत लस न घेतलेल्या पात्र नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरणाकरिता प्रवृत्त करण्यात येत आहे. याप्रकारे शहरातील 100 टक्के पात्र नागरिकांना डोज देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. नागरिकांनी सुद्धा या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचेच फलित लसीकरणाचा टप्पा 30 लाखांच्यावर गेला असल्याचं अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितलं.