चंद्रपूर : राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रपूरमध्ये 3 कोटी रुपयांचा दारूसाठा रोडरोलर खाली घालून नष्ट करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात ठिकाणी हा दारुसाठा नष्ट करण्यात आला. मागील 3 वर्षात केवळ घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा 3 कोटी रुपयांचा दारूसाठा पकडण्यात आला होता. एकूण 388 दारूच्या गुन्ह्यात हा साठा जप्त करण्यात आला होता. यापुढच्या काळातही चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील मालखान्यात ठासून भरलेला दारूसाठा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे (Road roller on seized alcohol of 3 crore by Chandrapur police).
स्थानिक पोलीस ठाणे आणि उत्पादन शुल्क विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या एकूण दारूसाठ्याची किंमत 3 कोटी रुपये इतकी होती. हा दारूसाठा रोडरोलर खाली फोडून नष्ट करण्यात आला. मागील केवळ 3 वर्षात घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दारूसाठा पकडल्यानं दारूतस्करांची मजल कुठपर्यंत गेली होती हे लक्षात येतं. मात्र, न्यायालयीन आदेशानुसार आता पोलिसांनी हा संपूर्ण साठा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु केलीय, अशी माहिती घुग्गुस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी दिलीय.
पोलिसांनी केलेल्या कारवाईचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. यात जप्त करण्यात आलेला पोलीस कस्टडीतील दारूसाठा रोडरोलर खाली घालून फोडल्यानंतर त्या ठिकाणी काचांचा ठिग साचलेला दिसत आहे. यानंतर सध्या चंद्रपूरमध्ये दारुबंदी हटवण्याच्या निर्णयासोबत या कारवाईचीही जोरदार चर्चा होत आहे.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Road roller on seized alcohol of 3 crore by Chandrapur police