NMC Scam | अबब! 415 रुपयांची मशीन 1,880 रुपयांना खरेदी; काही वस्तूंची चारपट, तर काहींची सहापट किमतीत खरेदी
1199 रुपयांचा ड्रम 24 हजारांत तर 899 रुपयांचे टोनर 17 हजार 900 रुपयांत खरेदी केल्याचा प्रताप मनपाच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी केलाय. महापालिकेने माहिती अधिकारात कॉंग्रेस नगरसेवक संदीप सहारे यांना काही माहिती दिली.
नागपूर : मनपा स्टेशनरी घोटाळ्यातील वेगवेगळ्या सुरस कहाण्या आता पुढं येऊ लागल्या आहेत. त्यातील एक म्हणजे पंचींग मशीन. कांगारू कंपनीची पंचींग मशीन बाजारात 415 रुपयांची आहे. पण, ही मशीन एक हजार 880 रुपयांत खरेदी करण्यात आली. याचा अर्थ चार पटीपेक्षा जास्त किंमत मनपाकडून वसूल करण्यात आली. तर काही वस्तूंची खरेदी सहापट किमतीत केल्याचं आता दिसून येत आहे. ही माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. यात कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याशिवाय हे कस शक्य आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
असे चढविले वस्तूंचे दर
कॅननचे टोनर 2 हजार 850 रुपयांत खरेदी करण्यात आले. बाजारात या टोनरची किंमत 305 रुपये आहे. रिको झेरॉक्स मशीनचे टोनर 3 हजार 300 रुपयांत खरेदी करण्यात आले. खरं तर बाजारात त्यांची किंमत 499 रुपये आहे. याशिवाय कॉर्डलेस फोन 6 हजार 800 रुपयांत खरेदी करण्यात आले. त्याची किंमत फक्त 1 हजार 299 रुपये आहे. 749 रुपये किंमत असलेला इमरजन्सी लॅम्प मनपानं 1 हजार 900 रुपयांत खरेदी केला. लहान पंचींग मशीन बाजारात 33 रुपयांत मिळते. या मशीनची किंमत 80 रुपये लावण्यात आली आहे. 499 रुपयांची ऑफिसबॅग 940 रुपयांत खरेदी करण्यात आली. 49 रुपयांचे टर्किश नॅपकिन155 रुपयांत खरेदी केल्याचे दाखविण्यात आले. या खरेदीत गेल्या कित्तेक वर्षांपासून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नगरसेवक संदीप सहारे यांनी केलाय.
दर पाहून विस्फटले डोळे
1199 रुपयांचा ड्रम 24 हजारांत तर 899 रुपयांचे टोनर 17 हजार 900 रुपयांत खरेदी केल्याचा प्रताप मनपाच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी केलाय. महापालिकेने माहिती अधिकारात कॉंग्रेस नगरसेवक संदीप सहारे यांना काही माहिती दिली. यातून कॉर्डलेस फोन, वेगवेगळ्या कंपनीच्या झेरॉक्स मशीनचे टोनर, ड्रम, इमरजन्सी लॅम्प खरेदीचे दरही अव्वाच्या सव्वा लावण्यात आले आहेत. सहारे यांनी ॲमेझॉनवरून टोनर, कॉर्डलेस फोन, ड्रम, लॅम्प खरेदीचे दर बघीतले. त्यांनी त्यांना माहिती अधिकारात देण्यात आलेले याच वस्तूंचे दर बघीतले तर त्यांना मोठा फरक दिसून आला. हे सारे पाहून डोळे विस्फटल्याशिवाय राहत नाही. या साऱ्यांचं ऑडिट कसं होते, हेही न सांगितलेलंच बरं.