Nagpur ZP | पंचायती राज समितीचा नागपूर दौरा; शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील अनियमिततेवर रोष
विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने (पीआरसीने) गुरुवारपासून नागपूर जिल्हा परिषदेच्या दौर्याची सुरुवात केली. गुरुवारी पहिल्याच दिवशी समितीने जि.प.च्या शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील अनियमिततेवर रोष व्यक्त केला. शिक्षण आणि बांधकाम विभागाच्या सचिवांची ते साक्ष नोंदविणार असल्याची माहिती आहे.
नागपूर : आमदार संजय रायमुलकर (MLA Sanjay Raimulkar) हे पंचायती राज समितीचे (पीआरसी) प्रमुख आहेत. निमंत्रित सदस्यांसह समिती आमदारांची एकूण संख्या 32 आहे. पीआरसीचा तीन दिवसीय दौरा गुरुवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी समितीने जिल्हा परिषदेतील पदाधिकारी (Zilla Parishad office bearers) व स्थानिक आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर वर्ष 2015-16 व 2016-17 या काळात घेण्यात आलेल्या आक्षेपावरील करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तसेच कामाचा समितीने आबासाहेब खेडकर सभागृहात (Abasaheb Khedkar Hall) आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे विद्यमान व तत्कालीन विभागांचे प्रमुख उपस्थित होते. समितीकडून विभागनिहाय माहिती घेण्यात आली. बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या काही कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. यावर विभाग प्रमुखांकडून समाधानकारक उत्तर देता आले नाही.
पाणीपुरवठा, सिंचन विभागाला खडसावले
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व लघुसिंचन विभागाला समितीने चांगलेच खडसावले. दोन्ही विभागांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांनी सीईओ योगेश कुंभेजकर यांना दिले. याशिवाय समितीने पंचायत विभागासह आरोग्य, पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजावर असमाधान व्यक्त केले. समितीने शिक्षण विभागाच्या आक्षेपाची माहिती घेत असताना शिक्षणाधिकारी यांनी नवीन असल्याचे सांगितले. त्यावर समिती सदस्यांनी नवीन असला तरी अधिनस्त अधिकारी, कर्मचार्यांकडून माहिती घेऊन कार्यवाही का केली नाही, असा सवाल उपस्थित केला.
झेडपीत रेड कार्पेट
या दौर्याच्या पार्श्वभूमीवर झेडपीतील मुख्य प्रवेशद्वार गुरुवारी सकाळपासूनच बंद होता. कार्यालयातील अधिकार्यांसह कर्मचार्यांच्याही वाहनतळाची व्यवस्था विभागीय आयुक्तालय परिसरात करण्यात आली होती. याशिवाय मुख्य प्रवेशद्वारावरून सामान्यांना प्रवेश बंदी होती. परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. समितीच्या सदस्यांच्या स्वागतासाठी झेडपी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. समिती येणार असल्याने संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये रेड कार्पेट टाकण्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावले होते.
शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देणार भेटी
पंचायत राज समिती सदस्य शुक्रवारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पंचायत समित्यांना भेटी देतील. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी देतील. पंचायत समित्याचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकार्यांची प्रश्नावली क्रमांक दोनच्या संदर्भात साक्षही नोंदवतील.