उदय सामंत यांच्या भ्रष्टाचाराच्या एकूण फायली किती?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितला
मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी कराच. मग आम्ही बघतो. मुंबईत कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत. मुंबईत सर्व देश सामावला आहे.
नागपूर: राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. या मुद्द्यावरून संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहे. राऊत यांनी आज राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. उदय सामंत यांच्या नाही 25 फायली आमच्याकडे पडून आहेत. त्या आम्ही सभागृहात मांडणार होतो. पण सीमावादाचा ठराव असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही इतर विषय आणू नका असं सांगितलं म्हणून आम्ही थांबलो, असं संजय राऊत म्हणाले. मात्र, या फायली कोणत्या भ्रष्टाचाराच्या आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. परंतु, राऊत यांच्या या नव्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
एकाच गटाच्या मंत्र्यांच्या फायली बाहेर येत आहेत. ही सर्व प्रकरणं गंभीर आहेत. तुम्ही म्हणता आम्ही बॉम्ब फोडावा. मग हे फुटत आहे ते काय आहे? एनआयटी घोटाळा हे टोकन आहे, भ्रष्टाचाराची प्रकरणं अजूनही येईतील, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राठोड यांच्या दोन जमिनीचे भ्रष्टाचार, सत्तार यांची कलेक्शनगिरी, त्यांनी 36 एकर गायरान जमीन देऊन टाकली, ही सुरुवात आहे. उदय सामंत यांचं एक प्रकरण नाही. आमच्या खोलीत सामंतांची 25 प्रकरणं पडली आहेत. पण सीमा प्रश्नाचा ठराव महत्त्वाचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सांगितलं इतर विषय घेऊ नका. अनेक प्रकरणं आहेत. ही प्रकरणं देणारे भाजपचेच लोक आहेत, असं राऊत म्हणाले.
सरकारमधील लोक सामान्यांच्या जमिनी कुणाच्या तरी घशात घालत असतील तर त्यावर विरोधकांनी बोललंच पाहिजे. त्यामुळेच आम्ही बोलत आहोत. जयंत पाटलांनी जो शब्द वापरला, निर्लज्ज सरकार, गेंड्याच्या कातड्याचे सरकार आहे हे. आमच्यावर कितीही आरोप करा आम्ही खुर्च्यांना चिटकून राहू. आमच्यात नैतिकता नाही, अशा पद्धतीने वागणारं हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
थोडी जरी नैतिकता असती तर मुख्यमंत्र्यानी चार मंत्र्यांचे राजीनामे घेतले असते. पण हे सर्वच बोगस आहेत. त्यांची डिग्रीच काय? यांचं अस्तित्वही बोगस आहे. हे सर्व डिस्क्वॉलिफाय होतील, असा दावाही त्यांनी केला.
ठामपणे सांगतो. शिवसेनेच्या आमदारांना बोलू द्यायचं नाही. विरोधी पक्षाचा आवाज दाबायचा. विधानसभा अध्यक्षांनी पक्षपात करू नये. हा लोकशाहीचा देश आहे. तुम्ही घटनात्मक खुर्चीवर बसून विरोधी पक्षांचा आवाज दाबत असाल तर काय बोलणार? जयंत पाटील यांनी जो संताप व्यक्त केला तो महाराष्ट्राचा संताप आहे, असंही ते म्हणाले.
मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी कराच. मग आम्ही बघतो. मुंबईत कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत. मुंबईत सर्व देश सामावला आहे. बिहारपासून कर्नाटकपर्यंत सर्वजण गुण्या गोविंदाने राहत आहेत.सीमा भागात तसं होतं का? सीमाभागच केंद्र शासित होईल. तिथे मराठी बांधवांव अत्याचार होत आहेत, असंही त्यांनी ठणकावले.