Sanjay Raut : आमच्या खासदारांचा आकडा जसाच्या तसा राहील, उदय सामंतांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर
उदय सामंत हे नशीब 115 खासदार बोलले नाहीत, 15 असतील किंवा 115 असतील, पण शिवसेनेच्या खासदारांचा आकडा हा उद्याच्या लोकसभा निवडणुकीत कायम राहील हेच मी सांगू शकतो, असे राऊत यावेळी म्हणाले आहेत.
नागूपर : शिवसेनेतली पडझड रोखण्यासाठी ठाकरेंबरोबर (Uddhav Thackeray) उरलेल्या नेत्यांची सध्या धावपळ सुरू आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे दोन दिवसाच्या नागपूर (Nagpur) दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी विमानतळावर उतरताच त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. याचवेळी त्यांनी लोकसभेतील आमच्या खासदारांची संख्या ही तुम्हाला लवकरच दिसून येईल, आमची संख्या जशीच्या तशी राहील एवढा विश्वास मी तुम्हाला देतो, असा पुनरुच्चारी केला आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात खासदार भाजपसोबत असल्याचे दावे एकनाथ शिंदे गटातील आमदार करत आहेत. उदय सामंत हे नशीब 115 खासदार बोलले नाहीत, 15 असतील किंवा 115 असतील, पण शिवसेनेच्या खासदारांचा आकडा हा उद्याच्या लोकसभा निवडणुकीत कायम राहील हेच मी सांगू शकतो, असे राऊत यावेळी म्हणाले आहेत.
सरकारवरही जोरदार निशाणा
ज्या पद्धतीने या सरकारचं काम चालू आहे, मागच्या सरकारने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या जनतेचं हित पाहून घेतलेले निर्णय होते. मात्र विरोधासाठी विरोध म्हणून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे. हे दोघांचं कॅबिनेट यासाठीच काम करत आहे. मात्र आम्ही बघून घेऊ दिवस बदलत जातात. सत्ता परिवर्तन होत असतं. तुम्ही आज पाहिलं की कॅबिनेट बैठक झाली. पण अजून सरकार का अस्तित्वात आलं नाही? मंत्रिमंडळाचा शपथविधी का होत नाही? मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना त्यांच्याबाबत अजून निर्णय झाला नसताना मंत्रिमंडळाने शपथविधी घेतला नसताना, मुख्यमंत्र्यांवर स्वतः अपात्रतेची कारवाई होईल, त्यांना राजभवनात शपथ देणे हे बेकायदेशीर आहे आणि 19 तारखेला जर कोणी शपथ घेणार असतील तर ते अत्यंत घटनाबाह्य आहे, अशी टीकाही यावेळी राऊतांनी केली आहे.
शिवसैनिक कुठेही गेले नाहीत
तसेच शिवसैनिक कुठेही गेले नाहीत, पक्षाचे काम आहे, संघटनेचे काम आहे, लोकांना भेटणं आहे, कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, तुम्ही पाहिला असे सगळे कार्यकर्ते जागच्या जागी आहेत, हे चित्र महाराष्ट्रात सध्या दिसत आहे. हा भास आहे, हे तात्पुरतो आहे, शिवसेना अशा अनेक प्रसंगातून बाहेर पडली आहे. 56 वर्ष शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. या 56 वर्षात अनेक संकटं, अनेक वादळ आम्ही पाहिली आहेत, मी मागच्या माझ्या भेटीत सुद्धा नागपूरला सांगितलं होतं की शिवसेना विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करतेय, हळूहळू तुम्हाला चित्र स्पष्ट होईल, असेही राऊतांनी यावेळी बजावलं.
कार्यकर्ते हे पक्षाचे असतात, नेत्यांचे नाही
तसेच मला माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी नागपुरात दोन दिवसांसाठी पाठवलं आहे. ते फक्त लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी, लोकांशी संवाद साधण्यासाठी पाठवलं आहे. शिवसेनेचे पदाधिकारी यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. नागपूर आणि नागपूरच्या ग्रामीण भागातील कोणीही शिवसेनेतून बाहेर गेलेलं नाही. सगळे जागच्या जागी आहेत. आज या विमानतळावर मला घेण्यासाठी सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित आहेत, त्यामुळे चिंता नसावी. इथे कुणाच्या व्यक्तिगत कार्यकर्ते नाहीत. इथे पक्षाचे शिवसैनिक आहेत. कार्यकर्ते पक्षाचे असतात रामटेक मधून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इकडे आले आहेत,संध्याकाळी रामटेक मध्ये माझी बैठक आहे. कुणी आले कुणी गेले यात आम्ही वेळ नाही घालवणार, पक्ष संघटना मजबुतीकडे आम्ही वेळ देतोय, हे आमचे ध्येय आहे, असेही राऊतांनी नागपुरातून ठणाकवून सांगितलं आहे.