सरसंघचालक मोहन भागवत यांचं आरक्षणाबाबत महत्त्वाचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध सामाजिक प्रश्नांवर मोहन भागवत यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांना आरक्षणाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.
नागपूर | 6 ऑगस्ट 2023 : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण प्रचंड तापलं आहे. जालन्यात मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नऊवा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज जरांगे यांच्या मागणीनुसार निजामकाळातील शैक्षणिक आणि महसूल नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं जाहीर केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. संसदेत याबाबत एक कायदा करुन 50 टक्क्यांपेक्षाची मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर आरक्षणावर भूमिका मांडली.
“आपल्या देशात आरक्षण दिलंय. कारण देशात सामाजिक विषमतेचा इतिहास राहिलाय. सामाजिक विषमतेनं आपण 2 हजार वर्षे विषमता ठेवली. त्यांना आपल्या बराबरीने आणेपर्यंत आरक्षण राहील. परिवारात जो आजारी आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष ठेवतो. जोपर्यंत भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहील. संघ याचं समर्थन करतो. भेदभाव दिसत नाही, पण भेदभाव आजंही आहे”, असं मोहन भागवत म्हणाले.
‘समानता येईपर्यंत आरक्षणाची गरज’
“हायर सर्व्हिसेसमध्ये छुपा जातीभेद आहे. मंदिरात प्रवेश मिळत नाही. घोडी चढल्यावर मारले जाते. हे आजही आहे. त्यामुळे समानता येईपर्यंत आरक्षणाची गरज आहे”, असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं. “काही लोक म्हणतात, आरक्षणाची आम्हाला गरज नाही, असे लोक पुढे येत आहे. आम्ही भेदभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणार. त्यांनी 2000 वर्षे जातीवाद, भेदभाव सहन केला. आपण 200 वर्षे सहन तर काय फरक पडतोय”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.
मोहन भागवत आणखी काय-काय म्हणाले?
“विद्यार्थी आपल्या विवेकबुद्धाने आपला मार्ग ठरवू शकतात. का शिकायचं? हे ठरल्यावर, का शिकायचं? हे निश्चित होतं. शिकलेले विद्वान जगात कमी नाही, पण ज्यांना आपण लक्षात ठेवतो ते सर्व शिकलेले नसतात. याचा अर्थ फक्त शिक्षणाने विद्वान होत नाही. सामाजिक कार्य केलेल्या महान लोकांना आपण लक्षात ठेवतो. पण आपलेच पूर्वज आपल्याला लक्षात राहत नाहीत”, असं मोहन भागवत म्हणाले.
“अनेक संत शिकलेले नाहीत. संत कबीर शिकलेले नव्हते. माणूस जंगली जनावरांप्रमाणे शिकार करुन जगत नाही. समाजाच्या समोर जगण्याचा कॅामन उद्देश असतो. भारतीय समाज आणि अमेरिकन समाज यांच्या जगण्याच्या उद्देशात फरक आहे. भौतिक प्रगतीबाबत सर्वच विचार करतात. पण आपण किती दान धर्म केला याचा पण विचार करतो”, असं मोहन भागवत म्हणाले.
“आपल्याला गरजेचं आहे तेवढं कमीत कमी ठेवा आणि उरलेलं दान करा, असा आपला समाज आहे. कमावलेलं दान करा नाहीतर पुढील पिढीजवळ लक्ष्मी राहणार नाही, असं वडिलांनी सांगितल्यामुळे नागपूरातील तीन भाऊ 18 वर्षांपासून मेयो रुग्णालयात फळं वाटतात”, असं भागवत यांनी सांगितलं.
“पुस्तकाचं शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच जीवन शिक्षण महत्त्वाचं आहे. मी पण वसतीगृहात शिकलो. होस्टेलचं जीवन आम्हाला जीवनाचं शिक्षण देतात. परिचय झाल्यावर झगडा होतो, परिचय झाल्यावर मैत्री होते. जिथे राहतो तिथली भाषा यायला हवी. जिथे जातो तिथल्या जीवनात आपण मिसळायला हवं. आपलेपणा केवळ वाटायला नको, जगाण्यात दिसायला हवं”, असं मोहन भागवत म्हणाले.