नागपूर : राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने शहरी भागातील शाळा पुन्हा बंद करण्यात येत आहेत. मुंबई नवी, मुंबई ठाण्यातील शाळा बंद झाल्यानंतर आता नागपुरातल्याही 1 ली ते 8 वीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रोन सोबत डेल्टा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. तर ज्या ठिकाणी कोरोना नियम मोडले जातील त्यांच्यावर कठोर करावाई करण्याचा इशाराही दिला आहे.
पुण्यासारखेच नियम नागपुरात लागू
पुण्यात ज्या प्रमाणे नियम आहेत तेच नागपुरात लागू असणार, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. नागपुरात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. नागपुरातला आकडा 400 च्या पार पोहचला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 404 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. चोवीस रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8107 जणांच्या चाचण्या आज करण्यात आल्या आहेत. तसेच ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची सख्या 15 झाली आहे.
नियम मोडल्यास कठोर कारवाई
रेस्टॉरंट, थेटर आशा ठिकाणी निर्बंध आहेत त्याचे पालन झालं नाही तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सरकारी , खाजगी कार्यालयात सगळ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य राहील, असेही सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व वसतिगृह बंद राहणार आहेत, तर 15 फेब्रुवारीपर्यंत अकृषीय विद्यालये बंद राहणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तसेच तंत्रनिकेतन विद्यालयेही बंद राहणार आहेत. फक्त शाळाच नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही धोका वाढला आहे.