नागपूर : बेलतरोडी (Beltarodi) हद्दीत राहणाऱ्या वांद्रे दाम्पत्याचं लग्न तीन महिन्यांपूर्वी झालं. त्यांच्या घरात सोमवारी पहाटे सात दरोडेखोर तलवार, चाकू आणि दोरखंडासह घुसले. महिलेच्या गळ्याला चाकू लावला. दरोडेखोरांनी घरातील सोन्याचे दागिने आणि पैसे लुटले. त्यानंतर त्यांनी घराच्या आवारातच दारू पिऊन हैदोस घातला.
चिंचभवन येथे पुनर्वसन केलेल्या परिसरात मंगेश वांद्रे हे कुटुंबासह राहतात. मंगेश ट्रॅव्हल्सवर चालक आहे. पत्नी स्नेहा धंतोलीतील एका पतसंस्थेत नोकरी करते. पती-पत्नी झोपेत असताना रविवारी पहाटे तीन वाजता दरोडेखोरांनी स्वयंपाक खोलीच्या दाराला छिद्र पाडले. दाराची कडी उघडली नि घरात घुसले. त्यांच्यासोबत चाकू, तलवार आणि शस्त्र होती. एका दरोडेखोराचा स्टुलला धक्का लागला. औषधाची बाटली खाली पडल्यानं स्नेहाला उठल्या. पाहतात तर काय समोर सात दरोडेखोर. ओरडल्यास गळा चिरण्याची धमकी मिळाली.
दोघांनी स्नेहा आणि मंगेशच्या गळ्याला चाकू लावला. त्यांचे मोबाईल हिसकावले. स्नेहाच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी आणि अंगठी काढून घेतली. पैसे नसल्याचं सांगताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी कपाटातील साड्यांमध्ये ठेवलेला दागिन्यांचा डबा दरोडेखोरांच्या हाती लागला. त्यांनी सोन्याचे दागिने, 32 हजार रुपये नगदी आणि लॅपटॉप असा 81 हजारांचा ऐवज लुटून नेला. वांद्रे यांच्या घराबाहेरच दारूची बाटली आणि ग्लास दिसले. बाहेर दागिन्यांचा डबा फोडून दागिने काढले. दोन्ही मोबाईल झुडूपात फेकले. त्यानंतर दरोडेखोर पसार झाले.
वांद्रे दाम्पत्य समोरच्या मधुकर सुरणकर यांच्या घरी गेले. सुरणकर यांनी पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. तत्पूर्वी कृष्णा हिवराळे या सीआरपीएफ जवानाचं घर फोडलं. दरोडेखोरांनी दिवाण आणि कपाटातील सामान अस्तव्यस्त केले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पाच पथके तयार केली. दोघे संशयित पोलिसांना दिसले. दुचाकी सोडून वायूसेनेची भींत ओलांडून पळून गेले. पल्सर दुचाकीही चोरीचीच असल्याचं माहीत झालं.
नरसाळा (Narsala) येथील राधारमननगरात तेजराम वासनिक यांच्या घरी शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास चोरी झाली. तेजराम हे कार्यालयात गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी नंदनवन येथील बुटीकमध्ये गेल्या होत्या. त्यांच्या घरचा कुलूप तुटलेला दिसल्याचं शेजाऱ्यांनी फोन करून सांगितलं. ते घरी परत आले असता घरातील सर्व सामान फेकफाक केलेला होता. घरातील नगदी 25 हजार रुपये आणि 52 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. हुडकेश्वर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. चोरी करणारा कुणीतरी आजूबाजूचाच असावा असा संशय आहे. पोलीत त्या दिशेने तपास करीत आहेत.