राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारला चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेता येत नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून शरद पवारांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. तसंच देशात सध्या शांततेची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले.
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावर भाषण करत असताना सबंध देशाच्या निवडणुका एकावेळी व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली. हे असं पंतप्रधान बोलून 12 तास झाले नाहीत. तोवर आपल्याला ऐकायला मिळतंय की जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. पण झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालेली नाही. सबंध देशात एकावेळी निवडूक घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राची निवडणूक जाहीर न होणं हा एक प्रकारचा विरोधाभास आहे, असं शरद पवार म्हणाले.
बांग्लादेशमधील हिंसाचार आणि त्याचे भारत आणि विशेषत: महाराष्ट्रावर होत असलेल्या परिणामांवर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशला लागून आहेत. पण तिथं काही घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात परिणाम पाहायला मिळतील, असं कधी घडलं नाही. या घटनेच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण देशात सामजस्य आणि एक वाक्यता याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.
जे काही घडतंय ते राज्याच्या हिताचं नाही. आज शांततेची गरज आहे. त्यासाठी समाजातील सगळ्याच घटकांनी खबरदारी घ्यावी एवढंच मी बोलू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई यावर भाष्य करता येईल पण आज शांतता आणि सौहार्दाची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकरणातील अन्य बाबींवर मी भाष्य करू इच्छित नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.