धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर शिंदे गटाची आज बैठक, आमदार, खासदार करणार मंथन
यासंदर्भातील प्रश्नावली आम्हाला दिली होती. ती सर्व कागदपत्र आम्ही त्यांना पुरविली आहेत.
सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. यासंदर्भात रामटेकचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (MP Kripal Tumane) म्हणाले, आम्हाला अपेक्षा होती की काल चिन्हाचा निर्णय होईल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाण (Dhanushyaban) मिळेल. कारण आमची शिवसेना (Shiv Sena) खरी शिवसेना आहे. आमच्याकडे 56 पैकी 40 आमदार आहेत. 18 पैकी 12 खासदार शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळं या चिन्हावरचा हक्क आमचा आहे. असं आम्हाला वाटत होतं.
पण, निवडणूक आयोगानं हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. निवडणूक आयोगानं तात्पुरता हा शब्द वापरला असल्यानं आम्हाला अपेक्षा आहे की, लवकरच याबाबत निर्णय होईल. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल, अशी अपेक्षा तुमाने यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आम्ही सर्व कागदपत्र पुरविले आहेत. तुम्ही खरी शिवसेना कशी आहात. हा चिन्ह तुम्हालाच का मिळाला पाहिजे.
यासंदर्भातील प्रश्नावली आम्हाला दिली होती. ती सर्व कागदपत्र आम्ही त्यांना पुरविली आहेत. निवडणूक आयोगाच्या तात्पुरत्या दिलाशानंतर परमानंट दिलासा आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
आज संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक ठेवली आहे. आमदार, खासदार यांना या बैठकीला बोलावण्यात आलंय. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होईल.
आदित्य ठाकरे हे मंत्री होते. त्यावेळी आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख यांची कामं केली असली, तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती. पदाधिकाऱ्यांना भेटले जरी असते, तरी ही परिस्थिती त्यांच्यावर आली नसती. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते काहीही बोलतात.
निवडणूक चिन्हाबाबत नियमात जे आहे ते होईल. आम्ही सगळे पुरावे देत आहोत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल, असं मत शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केलं.