आमदार नितीन देशमुख यांचे हात आणि पाय पकडून उचलून नेले; नागपूरच्या वेशीवरच पोलिसांनी अडवली संघर्ष यात्रा
पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या वेशीवरच पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा अडवली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
नागपूर : नागपूरच्या वेशीवर आज सकाळी सकाळीच प्रचंड थरार पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली होती. अकोल्याहून निघालेली ही संघर्ष यात्रा नागपूरकडे निघाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला होता. मात्र, पोलिसांनी नागपूरच्या वेशीवरच ही संघर्ष यात्रा अडवली. त्यामुळे देशमुख आणि इतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर देशमुख हे जमिनीवर झोपले. मात्र, काही पोलिसांनी देशमुख यांचे हात तर काहींनी पाय पकडून त्यांना अक्षरश: उचलून नेले. पोलिसांनी नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जात आहे.
अकोल्याचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यापासून नागपूरपर्यंत पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली. आज सकाळी 8 वाजता ही संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवर धडकली. मोर्चेकरी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार होते. त्यामुळे नागपूरच्या वेशीवरच वडधान्ना येथे पोलिसांचा मोठा बंदोस्त ठेवण्यात आला होता. तसेच दत्तवाडी परिसरातही पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली होती. ही संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवर येताच पोलिसांनी आंदोलकांना वेशीवरच अडवलं. त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. फडणवीस यांच्या घरापर्यंत जाण्याची आंदोलकांनी परवानगी मागितली होती. पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आंदोलक आणखीनच भडकले. आंदोलकांनी नागपूरच्या वेशीवर रस्त्यावरच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
रस्त्यावरच ठिय्या
आमदार नितीन देशमुखही रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत होते. पोलिसांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची वारंवार विनंती केली. त्यांच्याशी चर्चा केली. पण देशमुख नागपूरमध्ये जाण्याच्या आणि आंदोलन करण्याच्या मुद्द्यावर ठाम होते. हे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच देशमुख हे जमिनीवर झोपले. त्यामुळे पोलिसांनी अखेर देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. देशमुख जागेवरून उठण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी देशमुख यांचे दोन हात आणि दोन पाय पकडून त्यांना अक्षरश: उचलून नेले.
अतिरेक सुरू आहे
पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही पदयात्रा जनतेच्या समस्यांसाठी आहे. अकोल्यातील जनतेला खार पाणी प्यावं लागतं आणि या भागात होणाऱ्या कामांवर जी स्थगिती आणली आहे ती स्थगिती उठवावी ही आमची मागणी आहे. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी जनतेसाठी आम्ही हे कार्य करत आहोत आणि ते करत राहणार असं सांगतानाच या सरकारचा अतिरेक सुरू आहे. पाण्यासाठी कार्यकर्त्यांना मारहाण केली जात आहे. आता आम्ही पाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी जाऊन आंदोलन करू, असा इशारा देशमुख यांनी दिला.