Nagpur Court | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थानातील घोटाळ्याचा गुन्हा कायम, काय आहे प्रकरण?
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या यांच्या संस्थानातील घोटाळ्याचा गुन्हा कायम आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींचा अर्ज फेटाळला. आरोपींनी सुमारे 18 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नागपूर : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawli) आहेत. शिवाय भावना गवळी या जनशिक्षण संस्था, महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या (Mahila Utkarsh Pratishthan) अध्यक्ष आहेत. या प्रकरणात भावना गवळी यांच्या तक्रारीवरून वाशिम जिल्ह्यातील रिसोड (Resod in Washim District) पोलीस ठाण्यामध्ये बारा मे 2020 रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या संस्थेमध्ये 18 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची अफरातफर झाली. या प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करावा म्हणून आरोपींनी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला. या आरोपींनी सुमारे 18 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे तक्रारीत आहे.
या आरोपींचा अर्ज फेटाळला
अफरातफरीचा हा गुन्हा रद्द करण्याची विनंती करणारा अर्ज आरोपींनी केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे संचालक भारत ज्ञानदेव देवगिरे, माजी सचिव अशोक नारायण गांडोळे, उपाध्यक्षा वर्षा अशोक हेळसकर, सहसचिव गणेश बालाजी ढोले, डी-फार्म महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक विनोद पंधरे, आयुर्वेद महाविद्यालयाचे लेखापाल संतोष सोमानी, अरुणा हालगे, शकुंतला कासार, महेश देवगिरे, हरिभाऊ देवगिरे, मधुकर हेळसकर, उद्धव गांडोळे, समाधान हेळसकर, संतोष हेळसकर, उपेंद्र मुळे, दिनेश दोरसेटवार व धनंजय मनोहर हालगे या आरोपींनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
पोलिसांना तपासाची संधी देणे आवश्यक
या अफरातफरी प्रकरणी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. हा गुन्हा दखलपात्र असल्याने पोलिसांना तपास करण्याची संधी देणे आवश्यक आहे. असा निर्वाळा देऊन नागपूर खंडपीठाने आरोपींनी दाखल केलेले अर्ज फेटाळले. शासनातर्फे वरिष्ठ विधीज्ञ सुबोध धर्माधिकारी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. विनोद ठाकरे यांनी सहकार्य केले. तक्रारदारांतर्फे वरिष्ठ ॲड. सी. एस. कप्तान व ॲड. पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यायालयात बाजू मांडली.