नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट ‘कलंक’ असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. त्यानंतर ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’, असं म्हणत निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीच सरकार स्थापन करणार नाही. एकवेळ सत्तेशिवाय राहू. पण राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या मुलाखतीचीच ही क्लिप उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणावेळी ऐकवली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
“अरे कोण म्हणतं विदर्भात शिवसेनेची ताकद नाही? मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की, अजूनही पाऊस रुसलेला आहे. माझ्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. पाहिजे तसा पाऊस येऊ दे, नाहीतर त्याची मेहनत वाया जाईल. पुन्हा तेच दृष्टचक्र सुरु झालं. म्हणून मी आई जगदंबेला प्रार्थना करतो की, लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य येऊ दे”, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अतिशय विचित्र झाली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था झालीय. काय झालंय? नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे झालंय काहीतरी नक्की, पण सांगण्यासारखं नाहीय”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“आपण म्हणतो, बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले. बरोबर ना? आपले माननीय उपमुख्यमंत्री यांची एक क्लिप आहे. ती तुम्हाला मी ऐकवतो. कारण ते बोलले की, मी पुन्हा येईल असं सांगितलं होतं. पण मी एकटा नाही आलो तर दोन जणांना घेऊन आलो. पण ते दोन जण कोण आहेत?”, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी संबंधित क्लिप ऐकवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा”, अशी खोचक टीका केली.
“नाही, नाही म्हणजे हो, हो, हो, असा त्याचा अर्थ. आता ते सांगतात की, उद्धव ठाकरेने खंजीर खुपसला म्हणून त्यांच्यासोबत गेलो. मग उद्धव ठाकरे याच्या पाठीत पहिला खंजीर कुणी खुपसला?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.