Nagpur Wedding | शुभमंगल सावधान होणार!, एवढ्यात बालसंरक्षण अधिकाऱ्यांची एन्ट्री, का झाला लग्नसमारंभ रद्द?
नवरी लग्नासाठी तयार होती. नवरदेव घोड्यावर बसून मंडपात येत होता. पण, बाल संरक्षण पथकानं विचारणा केल्यावर पालकांनी हा विवाह सोहळा रद्द झाल्याचे जाहीर केले.
नागपूर : आपल्याकडं बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यान्वये 2006 नुसार मुलाचे लग्नाचे वय 21 वर्षे तर मुलीचे लग्नाचे वय 18 वर्षे आहे. हा वयोगट पूर्ण केल्याशिवाय लग्नाला कायदेशीर मान्यता देता येत नाही. तरीही काही पालक लहान वयात लग्न करून देतात. असाच एक बालविवाह बालसंरक्षण पथकाने हानून पाडला. बालविवाह होत असल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाला मिळाली. महिला व बालकल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण (child protection officers) यांच्या टीमने घटनास्थळी भेट दिली. यशोधरा नगर पोलीस (Yashodhara Police) ठाण्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. नवरी लग्नासाठी तयार होती. नवरदेव घोड्यावर बसून मंडपात येत होता. पण, बाल संरक्षण पथकानं विचारणा केल्यावर पालकांनी हा विवाह सोहळा रद्द झाल्याचे जाहीर केले.
पालकांकडून लिहून घेण्यात आले हमीपत्र
मुलगी अल्पवयीन असल्याची तक्रार होती. त्यामुळं मुलीचा जन्मदाखला मागण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले. पथकाने पालकांना कारवाईचा धाक दाखविला. त्यामुळं पालकांनी विवाह सोहळा रद्द केला. मुलगी 18 वर्षांची होत नाही. तोपर्यंत लग्न करणार नाही, असे हमीपत्र मुलीच्या पालकांकडून लिहून घेण्यात आले. कायद्याची अंमलबजावणी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पथकाने त्यांना समजावून सांगितले.
इतरांवर होऊ शकतो गुन्हा दाखल
बालसंरक्षक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, विधी सेवा सेवक आर. एफ. पटेल, समुपदेशक अनिल शुक्ला, अंगणवाडी सेविका राजश्री शेंडे, दीप्ती शेंडे, धरती फुके, बालसंरक्षण अधिकारी साधना ठोंबरे, प्रतिमा रामटेके यांनी ही कारवाई केली. अल्पवयीन मुलीचे किंवा मुलाचे लग्न लावल्यास मुला-मुलीचे आईवडील, मंडप डेकोरेशनवाले, सभागृहाचे मालक, बँडवाले, आचारी, कॅटरिंगचे ठेकेदार, पंडित यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं. लाकडाऊनच्या काळात अशाप्रकारे अकरा लग्नसोहळे बाल संरक्षण पथकाने हाणून पाडले.
समाजधुरीणांनाच यावे लागणार पुढे
ग्रामीण भागातच बालविवाह होतात, असा समज होता. परंतु, शहरातही काही लोकं बालविवाह करतात, हे या घटनेवरून दिसून येते. शहरातील घटना असल्यामुळं ही उघडकीस आली. परंतु, ग्रामीण भागात तक्रार करणारे कुणी नसल्यानं अशा घडना घडत असतात. पण, शासनाकडे पुरेसा मनुष्यबळ नसल्यानं ते कुठेकुठे चौकशी करतील आणि बालविवाह थांबवतील. यासाठी समाजातील लोकांनी पुढाकार घेतला पाहिले.