Nagpur leopards | बिबट्या आला रे..! सहा जनावरे केली फस्त; कन्हान शेतशिवारात दहशत
कन्हान, पेंच नदी शेतशिवारात बिबट्यानं दहशत माजविली. गेल्या काही दिवसांत सहा जनावरी फस्ट केली. त्यामुळं बिबट्या आला रे आला, अशी हाक एैकू येते.
नागपूर : पारशिवनी तालुक्यातील पिपरी-कन्हान शेत शिवारात संदीप ठाकरे यांच्या शेतात जर्सी गायीचे कालवड बांधले होते. बिबट्याने हल्ला करून शुक्रवारी पहाटे हल्ला करून शिकार केली. या भागात ही सहावी शिकार असल्याचं सांगितलं जातं. यामुळं पिपरी, गाडेघाट, जुनिकामठी, घाटरोहना, गोंडेगाव, टेकाडी, वराडा, वाघोली, एंसबा, नांदगाव, बखारी या कन्हान व पेंच नदी काठालगत असलेल्या गावकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं
पिपरी-कन्हान शेतशिवारातील रानी बागीच्याजवळ गुरुवारी सायंकाळी संदीप ठाकरे हे आपल्या शेतात पाळीव जनावरे बांधून घरी आले. दुसर्या दिवशी कालवड दिसली नाही. शुक्रवारी शेतात गेल्यावर काही अंतरावर कालवडीचा फडशा पाडलेला दिसला. संदीप ठाकरे यांनी गावकर्यांच्या सहाय्याने वन विभाग पटगोवारीचे वनरक्षक एस. जी. टेकाम यांना घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली. वनरक्षकांनी आपले वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्र सहायक ए. सी. दिग्रसे यांना माहिती दिली. दिग्रसे स्वत: व वनरक्षक एस. जे. टेकाम यांनी घटनास्थळी पोहचून निरीक्षण केले. पंचायत समिती पारशिवनीचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल वनविभागाचे वनक्षेत्र सहायक अधिकाऱ्यांना दिला.
गावकरी का झाले भयभित
कन्हान व पेंचनदी काठालगतच्या गावच्या शेतशिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला. आतापर्यंत बखारी, गाडेघाट, वराडा व पिपरी येथील शेतशिवारात सहा पाळीव जनावरांची शिकार बिबट्यानं केली. यामुळं परिसरातील गावकरी व शेतकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लवकरात लवकर या बिबट्याला पकडण्यात यावे. तसेच पीडित पशुपालक संदीप ठाकरे यांना चोवीस हजार रुपयांची नुकसानभरपाई वनविभागाने त्वरित देण्यात यावी, अशी मागणी मोतीराम रहाटे व पिपरी-कन्हान आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.