…तर आम्ही तुमचं स्वागत करू, अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांना असं का म्हंटलं
तुमच्या जीवावर लढा. आम्हाला हरवा. तर आम्ही तुमचं स्वागत करू.
नागपूर : विधान परिषदेत आज अनिल परब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खडाजंगी उडाली. बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचा अधिकार कुणाचा यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी अनिल परब यांची फिरकी घेतली. ठाकरे गटाचे नेते अनिल परब विधान परिषदेत बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे आपल्या कर्तुत्वाला आमचा सलाम आहे. कारण आपण ५० आमदार आणि १३ खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे. पण, बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की, भाजपच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही. शिंदे गटातील किती लोकं भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत. याची आम्हाला पूर्ण कल्पना असल्याचंही अनिल परब यांनी सांगितलं.
तुमच्या जीवावर लढा. आम्हाला हरवा. तर आम्ही तुमचं स्वागत करू. आम्हीदेखील तेवढ्याच टोकाचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही आम्हाला हरवलात तर अजीबात वाईट वाटणार नाही.पण, भाजपच्या मदतीनं हरवलात तर आम्हाला दुःख वाटेल, असं अनिल परब यांनी म्हंटलंय.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांना टोला लगावला. आपण चिंता करू नका. तुम्ही निवडून आलात तेव्हा भाजपचीच मदत लागली तुम्हाला. जे आमदार, खासदार उरलेत तिकडं त्यांनीही निवडणुकीत मोदी साहेबांचा फोटो लावला होता.
ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात त्या दिवसांपासून बाळासाहेबांवर बोलण्याचा तुम्हाला अधिकारचं नाही. बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचा अधिकार नसल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचा अधिकार आम्हाला आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.