काही लोकं मन की बात ऐकवितात, आम्ही मात्र… शशी थरूर यांचं म्हणणं काय?
पार्टीमध्ये काही बदल हवे. त्यासाठी मी उभा झालो आहे.
सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे निवडणुकीतील उमेदवार असलेले शशी थरूर यांनी नागपुरात आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, या निवडणुकीमुळे दुसरे पक्ष आमच्या पक्षाकडे बघायला लागले की ही पार्टी लोकशाहीची आहे. कार्यकर्ता ठरवेल की पार्टीचं भविष्य कोणाच्या हातात असेल. मी अपेक्षा करतो की पार्टीमध्ये बदल झाला पाहिजे. त्यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभा झालो.
कॉंग्रेस जीवंत ठेवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरला. आम्हाला त्या लोकांना वापस आणायचं आहे जे आमच्या सोबत होते. मात्र काही काळापासून दुसऱ्या पक्षात गेले. आम्हाला पार्टीत कार्यकर्त्याला शक्तिशाली बनवायचं आहे.
पक्षात काही बदल हवेत
आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. कारण सगळे भारताचे नागरिक आहेत, असंही थरूर यांनी सांगितलं. मल्लिकार्जुन खर्गे आणि मी उमेदवार आहोत. आम्ही दोघे शत्रू नाही एकाच पार्टीचे आहोत.
पार्टीमध्ये काही बदल हवे. त्यासाठी मी उभं झालो आहे. खर्गे पार्टीचे मोठे नेते आहेत. त्यांचा सन्मान आहे. काँग्रेस पार्टीच्या टॉप 3 मध्ये खर्गे आहेत, असंही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेकडे लोक अपेक्षेने पाहत आहेत. लोकांना काँग्रेस पाहिजे आहे.
काँग्रेस युवकांची असली पाहिजे
नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षात जे जाळ विणला ते आता लोकांना नको आहे. काही लोक मन की बात ऐकवितात. आम्ही जन की बात ऐकतो, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर थरूर यांनी निशाणा साधला.
जिल्हा अध्यक्ष बनवायचा असेल तर काँग्रेस अध्यक्ष यांची सही लागते. सगळ्या गोष्टी काँग्रेस अध्यक्ष ठरविणार हे आता थांबायला पाहिजे, अशी काँग्रेस मला अपेक्षित आहे. काँग्रेस ही युवकांची असली पाहिजे. कारण हा देश युवा स्थितीत आहे, असंही यावेळी थरूर यांनी सांगितलं.