पंकजा मुंडे ‘त्या’ पक्षाची मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारणार?; सुधीर मुनगंटीवार यांचं एका वाक्यात उत्तर
2024 ला पुन्हा मोदी आल्यास जनता आपल्याला विसरेल. आपले डिपॉझिट जप्त होईल असे विरोधकांना वाटत आहे. नितीशकुमार भाजपसोबत असताना बिहार राज्य विकासात आगेकूच करत होते. मात्र आता वेगाने अधोगती होत आहे.
चंद्रपूर : भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे यांना तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ, असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पंकजा मुंडे ही ऑफर स्वीकारणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. तर या ऑफरवर पंकजा मुंडे या उत्तर देतात याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही बीआरएसच्या या ऑफरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बीआरएस पक्ष महाराष्ट्रात येण्यासाठी प्रचंड घाईत आहे. मात्र महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये देखील बीआरएसचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे, त्यांच्या कन्या आणि त्यांचे राजीनामा दिलेलं 3 मंत्री यांच्या बाबतीत घडलेली राजकीय घटना पुढ्यात आहे. हैदराबाद महापालिकेत देखील भाजप 3 वरून 50 पर्यंत मजल मारू शकलाय. राष्ट्रभक्त- देशभक्त मतदार तुष्टीकरणाची नीती चालू देणार नाही. बीआरएसने पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर म्हणजे खडे टाकून बघण्याचा प्रकार आहे, असं सांगतानाच पंकजा मुंडे राष्ट्रभक्तीने प्रेरित राजकारण करतात. ते या ऑफरला प्रतिसाद देणार नाहीत, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
स्वप्न पाहण्याला मनाई नाही
महाराष्ट्रात सध्या दहाहून अधिक मुख्यमंत्री स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत. दहाच काय राज्यात शंभर मुख्यमंत्री असावेत. स्वप्न पाहण्याला घटनेत कुठलीही मनाई नाही. मात्र या सर्व भावी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनात काय आहे हे बॅनरद्वारे सांगावे. यासोबतच या सर्वांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण करावे हे महत्त्वाचे आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
सोनिया सेनेचे सदस्य
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाटणा दौऱ्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे आता हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य झाले आहेत. मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला बसून त्यांनी हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींपुढे हिंदुत्वाचे समर्पण केले आहे. देश असो वा राज्य उद्धव ठाकरे यांची अवस्था दारुण झाली आहे, असं ते म्हणाले.
विरोधकांची एकजूट म्हणजे..
विरोधकांची पाटणा येथील एकजुटीची बैठक म्हणजे कुठलाही विचार नसलेली गोष्ट आहे. ही बैठक म्हणजे इंजिन विना गाडी आणि आत्म्या विना शरीर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि जगात देशाचा गौरव वाढवत आहेत. मात्र पाटण्यातील सर्व विरोधकांना स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराच्या भविष्याची चिंता सतावत असल्याने ते एकत्र आले आहेत, अशी टीका त्यांनी केली.