Suicide note | सुसाईड नोट बायकोला पाठविली, हिंगणघाटवरून आत्महत्या करण्यासाठी नागपुरात आला; पोलिसांची एंट्री झाल्यावर वेगळंच घडलं!
प्रिय बायको, मुलाला मोठे कर आणि चांगले संस्कार दे. मुलाचे भविष्य पाहता मला आत्महत्या करण्याची इच्छा नाही. परंतु, माझा नाईलाज आहे. असे आयुष्य मी नाही जगू शकत. मी मेल्यावर माझ्या मृतदेहाला माझ्या मुलाच्याच हाताने मुखाग्नी दे.
नागपूर : बत्तीस वर्षांचा तरुण. घरी आईवडील-बायको. सुखाचा संसार. पण, घरगुती भांडणात तो पिसला गेला. एकीकडं बायको तर दुसरीकडं आईवडील. मग, जीवन नकोसे झाले. त्याने आत्महत्या करणार असल्याचे बायकोला व्हॉट्सअपवर पाठविले आणि आत्महत्या करण्यासाठी हिंगणघाटवरून नागपूरला आला. पण, पोलिसांची एंट्री झाल्यावर वेगळचं घडलं.
एकीकडं बायको, दुसरीकडं आईवडील
रूपेश (वय 32-नाव बदललेलं) हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचा. तो लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. लॅबमध्ये सहायक असलेल्या तरूणीशी प्रेमप्रकरण चालले. कुटुंबीयांच्या सहमतीनं 2017 मध्ये लग्न केलं. घरी पाळणा हलला. पण, घरोघरी मातीच्या चुली. त्याप्रमाणं त्याच्या आई आणि पत्नीमध्ये वाद निर्माण झाले. इकडं आड नि तिकडं विहीर अशी रूपेशची परिस्थिती झालाी. बायकोच्या आग्रहाखातर वेगळा राहू लागला. पण, आईवडिलांपासून दूर राहणे त्याला सहन होत नव्हते. शेवटी मनाची कालवाकालव सुरू झाली. आठ दिवसांपूर्वी बायकोला माहेर पाठवून दिले. बायकोच्या मोबाईलवर सुसाईड नोट पाठविली. आत्महत्या करण्याच्या विचारानं घराबाहेर पडला.
भावनिक सुसाईड नोट
प्रिय बायको, मुलाला मोठे कर आणि चांगले संस्कार दे. मुलाचे भविष्य पाहता मला आत्महत्या करण्याची इच्छा नाही. परंतु, माझा नाईलाज आहे. असे आयुष्य मी नाही जगू शकत. मी मेल्यावर माझ्या मृतदेहाला माझ्या मुलाच्याच हाताने मुखाग्नी दे. त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती मिळेल. बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला माफ कर, अशी सुसाईड नोट रूपेशने बायकोला पाठवून घर सोडले.
गुन्हे शाखेने केले समुपदेशन
रूपेश नागपुरात आला तो आत्महत्या करायला. शुक्रवारची रात्र त्यानं रेल्वेस्थानकावर काढली. पण, मुलाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर दिसायचा. त्यामुळं तो अस्वस्थ झाला. सीताबर्डीत पोहचला. तेवढ्यात, रूपेशचा मेव्हणा गुन्हे शाखेच्या एएचटीयू पथकाच्या पीआय मंदा मनगटे आणि सहायक निरीक्षक रेखा संकपाळ यांच्याकडे आला. त्यांनी लगेच हवालदार ज्ञानेश्वर ढोके यांच्या पथकाला रवाना केला. पीएसआय बलराम झाडोकार हे रेखा संकपाळ यांना तांत्रिक माहिती पुरवित होते. शेवटी शनिवारी दुपारी कोणताही सुगावा नसताना विलासला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळं रूपेशचा जीव वाचला. त्याचे समुपदेशन करून त्याला सुखरूप घरी पाठविण्यात आले.