नागपूर : ”आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा काळ खूप चालला. मात्र, आता सर्वसामान्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असा टोला काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजपला लगावला. ते नागपुरात एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. (Taken charge to defeat Narendra Modi attacked Nana Patole)
“या देशाला काँग्रेसच्या विचाराने स्वातंत्र्य मिळाले. आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा कार्यकाळ खूप चालला. मात्र, यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार्ज काढण्यासाठीच मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असे नाना पटोले म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या वेगवेगळ्या धोरणांवर सडकून टीका केली. “भाजपने सुशांतसिंग प्रकरणात राज्य सरकारला तीन महिने बदनाम केलं. यात भाजपचा एक मोठा नेता अडकला आहे,” असा आरोप पटोले यांनी केला. तसेच, भाजपचा नेता अडकल्यामुळेच सीबीआयने अहवाल दाबून ठेवला आहे, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. “नितीन गडकरी साहेबांनी एक बंदर स्वस्तात विकलं. सध्या देशात फास्टटॅग सुरु करण्यात आलं आहे. या प्रक्रियेतही मोठा भ्रष्टाचार आहे,” असा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच, आगामी दोन तीन दिवसांत यावर बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यापासून नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते केंद्र सरकार तसेच भाजपवर वेळोवेळी सडकून टीका करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी बॉलिवूड कलाकारांनाही धारेवर धरलं. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. मनमोहन सरकारच्या काळात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही. तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिलाय.
इतर बातम्या :
(Taken charge to defeat Narendra Modi attacked Nana Patole)