हत्तीची छेड काढणे तरुणांच्या अंगलट; तो थोडक्यात बचावला, नेमकं काय घडलं?
जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या कमलापूरमध्ये हत्ती कॅम्प आहे. या कॅम्पमधील हत्ती मंगला रस्ता ओलांडत होती. मंगलाजवळ जाऊन छेड काढणे तरुणाच्या अंगलट आले.
प्रतिनिधी, गडचिरोली : कोणताही प्राणी सहसा माणसावर तुटून पडत नाही. जंगलातील वाघही भुकेला असेल तर बहुधा जंगलातच शिकार करतो. हत्तींच्या बाबतीतही तसेच आहे. हत्ती सहसा कुणावर तुटून पडत नाही. पण, हत्तींची कुणी छेड काढण्याचा प्रयत्न केला, तर मात्र ते आपला हिसका दाखवल्याशिवाय राहत नाही. अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या कमलापूरमध्ये हत्ती कॅम्प आहे. या कॅम्पमधील हत्ती मंगला रस्ता ओलांडत होती. मंगलाजवळ जाऊन छेड काढणे तरुणाच्या अंगलट आले. तरुणाच्या कृत्याने संतापलेल्या मंगलाने थेट त्याच्यावर हल्ला चढवला. यात दुचाकीचा चेंदामेंदा झाला. तर तरुण थोडक्यात बचावला.
कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये ८ हत्ती
राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे आहे. सध्या या हत्ती कॅम्पमध्ये ८ हत्ती आहेत. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमाराची ही घटना. येथील हत्तींना मुक्त विहारासाठी लगतच्या जंगलात सोडण्यात येतात.
तरुणांनी छेड काढण्याचा प्रयत्न केला
शनिवारी येथील हत्ती मंगला कमलापूर-दामरचा मार्गावर होती. काही तरुण तिच्याजवळ गेले. आवाज आणि हातवारे करून छेड काढण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी संतापलेल्या मंगलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात तरुण थोडक्यात बचावले. पण त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला.
चित्रफीत समाज माध्यमात व्हायरल
या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाली. हत्तीच्या जवळ जाऊन छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. हत्ती कॅम्पमधील हत्ती कुणावर हल्ला केल्याची घटना दुर्मिळ आहे.
कमलापूर येथील हत्ती परिसरात फिरत असतात. मध्यंतरी काही हत्ती इकडे-तिकडे गेले होते. त्यांनी नुकसानही केली होती. पण, आता तशा घटना घडलेल्या नाहीत. काही अतिहौशी तरुण हत्तीला छेडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी हत्ती चिडून बदला घेतात. त्यामुळे हत्तीच्या वाटेला कुणी जाऊ नये.