नागपूर : नायलॉन मांजा हा जीवघेणा आहे. यामुळं माणसांचे गळे कापले जातात. कुणी मरतो तर कुणाला जखम होते. पक्ष्यांनाही याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून कायद्यानं यावर बंदी आहे. तरीही ऑनलाईन विक्री केली जाते. त्यामुळं या नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री कशी थांबविणार असा प्रश्न सायबर पोलिसांना पडला आहे. एका शिक्षकाचा याच नायलॉन मांजानं बुधवारी गळा कापल्याची घटना ताजी आहे. ताजबाग गेटसमोर मांजाला अडकाव करताना शिक्षकाचे बोटचं कापले गेले.
आशीनगर झोनचे किदवाई स्कूलचे शिक्षक सगीर अहमद आपल्या दुचाकीनं बुधवारी ताजबाग येथील घरी येत होते. उमरेड मार्गावरील ताजबाग गेटसमोर त्यांच्यावर नायलॉन मांजाने झेप घेतली. गाडीचा वेग कमी केला. पाहतात तर काय गळावर नायलॉन मांजाने हल्ला केला होता. हातात मांजा घेऊन आरशात अडकविला. तोपर्यंत त्यांची मान रक्तबंबाळ झाली होती. पंचवटी येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले. कारण तोपर्यंत त्यांचं बोटही कापले गेले होते. अशा घटना होऊ नये म्हणून काळजी घेणे येवढेच आपल्या हातात आहे. हेल्मेटचा वापर करावा. दुचाकी चालविताना गळ्याला दुपट्टा बांधावा. हातमोजे घालावे. उड्डाणपुलावरून जाणे शक्यतो टाळावे. लहान मुलांना दुचाकीच्या पुढं बसवू नये.
गेल्या काही दिवसात पतंगबाजीमध्ये विकृतता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक लोक प्रतिबंधित नायलॉन मांजाने पतंग उडवितात. नायलॉन मांजा पर्यावरणासाठी देखील हानीकारक आहे. मानवासाहित पशु पक्ष्यासाठी देखील धोकादायक आहे. त्यामुळं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. नागपूर पोलिसांकडून या संदर्भात रोज कारवाई केली जात आहे. दरम्यान, ऑनलाइन देखील नायलॉन मांजाची डिलीव्हरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शॉप क्लुज नावाच्या वेबसाईटवरून पोलिसांनी ऑनलाइन मांजा मागवत खात्री केली. शॉप क्लुज वेबसाईटच्या मॅनेजरवर नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. नायलॉन मांजाने पतंग उडविताना अनेक वेळा मांजा रस्त्यावरून जात असल्याने निष्पाप नागरिक जखमी झाले तर अनेक लोकांचा यात मृत्यू देखील झाला आहे. सोबतच पशु-पक्षी देखील नायलॉन मांजामुळं मृत झाल्याचं निदर्शनास आलं आहे. नायलॉन मांजा नष्ट होत नसल्यानं पर्यवरणासाठी देखील हानिकारक आहे. त्यामुळं पोलीस कारवाई करतील. मात्र आता नागरिकांनी आपली हौस भागविण्यासाठी निष्पाप लोकांच्या जीवावर उठण कितपत योग्य आहे याचा देखील विचार करणं आवश्यक झालं आहे, असं मत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी व्यक्त केलं.