Telemedicine project | मेळघाटमधील टेलिमेडिसीन प्रकल्प बंद!; तज्ज्ञ डॉक्टरांशी कसा साधता येणार संपर्क?
कोरोनाकाळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी टेलिमेडिसीन ही उपचार पद्धती चांगली होती. पण, पैशाच्या अभावी ही योजना रखडल्याचं सांगितलं जातंय.
अमरावती : मेळघाटमधील आदिवासींना आरोग्य सेवा तत्काळ मिळावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात टेलिमेडिसीन हा प्रकल्प राबवला गेला. तेव्हा तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी टेलिमेडिसीनला प्राधान्य दिले होते. मात्र, याच प्रोजेक्टला आताच्या सरकारच्या काळात टाळे लागले आहे.
काय होता प्रकल्प?
टेलिमेडिसीन सेवेच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधता येत होता. गंभीर आजार किंवा तातडीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत, याबाबतचा सल्ला घेण्यात येत होता. रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यास याची मदत होते. टेलिमेडिसीन सुविधेद्वारे जगभरातील तज्ज्ञांशी संपर्क साधून संबंधित रुग्णांवर काय औषधोपचार करावेत, याबाबत सल्ला घेणे शक्य होते. संबंधित रुग्णांच्या आजारांची इतंभूत माहिती टेलिमेडिसीन यंत्रणेद्वारे तज्ज्ञांना दिल्यानंतर ते संबंधित रुग्णांच्या औषधोपचाराविषयी मार्गदर्शन करत होते. त्यामुळं रुग्णांना इतर ठिकाणी रेफर न करता जागेवरच औषधोपचार करण्यास मदत होत होती.
आरोग्य अधिकारी म्हणतात, रुग्णांची गैरसोय होणार नाही
टेलिमेडिसीनच्या माध्यमातून गंभीर आजार किंवा तातडीची तथा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत, यासंदर्भात थेट तज्ज्ञांशी संपर्क साधला जात होता. मुंबई, पुणे व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णांवर उपचार करणे सोयीस्कर होत होते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली टेलिमेडिसीन सेवा मेळघाटात सध्या बंद पडली. तर फंड नव्हता त्यामुळं हे बंद पडलं. तसेच इ संजीवनी पोर्टल व आता आरोग्य सेवा उपचार सुरू आहेत. कुठल्याही प्रकारची गैरसोय रुग्णांची होणार नाही, याची काळजी घेत आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमले यांनी दिली.