Nagpur एसटी महामंडळाची सर्वात मोठी कारवाई, 200 कर्मचार्यांचे निलंबन
नागपुरातीलही एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिक हे संपावर गेले. यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकासह इतर आगारातून आजतागायत एकही बस बाहेर पडली नाही. परिणामी महामंडळाचा साडेनऊ कोटीहून अधिकचा महसूल बुडाला आहे.
नागपूर : एस महामंडळाचे कर्मचारी अद्याप कामावर रुजूच झाले नाहीत. त्यामुळं प्रशासनाकडूनही कारवाईचा सपाटा सुरूच आहे. शनिवारी महामंडळाकडून तब्बल 200 कर्मचार्यांचं निलंबन करणऱ्यात आलं. तरीही कर्मचारी कामावर रुजू व्हायला तयार नाहीत.
राज्य शासनानं कर्मचार्यांच्या वेतनामध्ये वाढ करूनही एसटी महामंडळाचं कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांचा संप सुरूच आहे. यामुळं राज्यातील विविध आगारातून शनिवारलाही बसेस बाहेर पडल्या नाही. विलीनीकरणासोबतच आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता राज्यभरातील एसटी महामंडळाअंतर्गत कार्यरत कर्मचारी संपावर आहेत. आता शासनानेही कर्मचार्यांना मोठा दिलासा देत संपावर तोडगा म्हणून कर्मचार्यांच्या मूळ पगारात भरघोस वाढ करण्याची घोषणा परिवहनमंत्री अँड. अनिल परब यांनी केली आहे. सोबतच संपकर्त्या कर्मचार्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन ते वारंवार करीत आहेत. परंतु यानंतरही अद्यापपर्यंत संपकरी संपावर कायमच आहेत.
एसटीचा साडेनऊ कोटींचा महसूल बुडाला
नागपुरातीलही एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिक हे संपावर गेले. यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकासह इतर आगारातून आजतागायत एकही बस बाहेर पडली नाही. परिणामी महामंडळाचा साडेनऊ कोटीहून अधिकचा महसूल बुडाला आहे. कर्मचार्यांनी संप मिटवावा यासाठी महामंडळाने निलंबनासोबतच सेवासमाप्तीच्या कारवायाही केल्यात.
आतार्यंत 348 वर कर्मचार्यांचे निलंबन
शनिवारी पुन्हा नागपूर विभागातील सावनेर, काटोल, उमरेड, रामटेक, इमामवाडा, घाटरोड, गणेशपेठ व वर्धमाननगर या आठ आगारातील प्रत्येकी 25 कर्मचारी अशा तब्बल 200 कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता नागपूर विभागातील एकूण संपकर्त्या 348 वर कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आलं. तर आजवर 90 कंत्राटी कर्मचार्यांची सेवाही समाप्त करण्यात आली असल्याचं नागपूर विभाग नियंत्रक डी. सी. बेलसरे यांनी सांगितलं.
निलंबनानंतर संपकरी कर्मचारी आणखीनच संतप्त झाले. त्यांनी शासनाशी थेट आरपारच्या लढाईचा इशारा देत संप कायम ठेवला. परिणामी महामंडळाचा महसूल बुडण्यासोबतच प्रवाशांचे चांगलेच हाल होत असल्याचे चित्र आहे. तेच राज्यातील इतर आगारातून 1046 बसेसही बाहेर पडल्या असून, त्यात 17 हजार 726 वर प्रवाशांनी प्रवास केला.