Nagpur Crime | अल्पवयीन प्रेमीयुगुल पळून गेले; नागपुरात दोघांचाही मृत्यू, नेमकं कारण काय?
प्रेमाची चर्चा गावभर झाली म्हणून दोघेही चिंतेत होते. या चिंतेतूनच आपली बदनामी होईल म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. विष प्राशन करून स्वतःला संपविले.
नागपूर : प्रेमप्रकरण (Love Case) कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. अशीच एक घटना नागपुरात (Nagpur) घडली. दोघेही अल्पवयीन. तो अठराचा तर ती सोळाची. लग्न करू शकत नाही. प्रेमाची चर्चा गावभर झाली म्हणून दोघेही चिंतेत होते. या चिंतेतूनच आपली बदनामी होईल म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. विष प्राशन करून स्वतःला संपविले. शरीरात विष भिनल्यानं त्यांना योग्य उपचार करता आले नाहीत. सुरज वगारे आणि रसिका गायकवाड अशी या मृतांची नावे आहेत. या दोघांचेही पालक खचून गेले आहेत. आपल्या पोरांनी असं का केलं, असा प्रश्न त्यांनी पडला आहे. सूरज वगारे हा अठरा वर्षांचा युवक. नरखेड (Narkhed) तालुक्यातील महेंद्री येथे राहणारा. तर रसिया गायकवाड ही सोळा वर्षांची युवती. रसिका तिच्या मामाकडे शिक्षणासाठी नायगाव येथे राहायची.
शेतात बेशुद्धावस्थेत सापडले
सूरज आणि रसिकाची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांच्या जवळीकतेची माहिती साऱ्या गावात झाली. दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी जलालखेडा येथे दोघेही पळून आले. तिथून ऑटोने मोवाडला गेले. मोवाडपासून दीड किमी अंतरावर गेले. गोधनी फाट्याजवळ दिलीप बोडके यांचे शेत आहे. त्या शेतावर दोघांनीही विषारी औषध प्राशन केले. उमरी येथील तरुण रस्त्याने जात होते. त्यांना सूरज आणि रसिका बेशुद्धावस्थेत सापडले. त्या दोघांनाही मोवाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी त्यांना नागपूरला रुग्णालयात पाठविले. तिथे दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गावभर झाली प्रेमाची चर्चा
गावात प्रेमाची चर्चा पसरल्यानं आपली बदनामी होईल, असे त्यांना वाटत होते. लग्न करण्याचा विचार होता. पण, लग्नासाठी आवश्यक असलेले वय त्यांच्याकडे नव्हते. ती फक्त सोळा वर्षांची, तर तो अठरा वर्षांचा होता. नैराश्येने त्यांना ग्रासले होते. त्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. शुक्रवारी वीस जानेवारीला त्यांनी विषारी औषध प्राशन केले.
मामाची पोलिसांत तक्रार
रसिका घरी दिसली नाही. त्यामुळं तिच्या मामाच्या घरचे चिंतेत पडले. त्यांनी रसिकाचा शोध घेतला. पण, ती कुठेही सापडली नाही. शेवटी तिच्या मामाने जलालखेडा येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अशातच तिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. शनिवारी पहाटे उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.