नागपूर : एनआयटीत सिव्हिल इंजिनीअर असलेल्या सिरभाते यांच्याकडं चोरी झाली. त्यांच्या पत्नीच्या नावे हार्डवेअरची दुकान आहे. गीतानगर येथे राहणारे हे दाम्पत्य लग्नाला गेले होते. दरम्यान, चोराने घरच्या आलमारीतील 17 तोळे सोन्यावर डल्ला मारला.
मोनाली सिरभाते यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. घटनेच्या दिवशी ते ओमकार सेलिब्रेशन लॉन येथे लग्नासाठी गेले होते. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते तिकडंच होते. घरी येऊन पाहतात तर काय आलमारीतील सोने चोरी गेले होते. घरी नोकर, दुकानात नोकर अशी सिरभाते कुटुंबीयांकडं नोकरांची रेलचेल होती. आलमारीची तोडफोड झाली नव्हती. त्यामुळं घरफोडीचा प्रश्नच नव्हता. कुणीतरी ओळखीच्याच व्यक्तीनं ही चोरी केली असावी, असा संशय पोलिसांना आला.
सिरभाते कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी सुरू झाली. पोलिसांनी संशयाच्या दिशेनं तपास सुरू केला. घरच्या दुकानातील सर्व नोकरांची विचारपूस झाली. शेवटी मयूर बुरडकर नावाच्या नोकराची हालचाल संशयास्पद दिसून आली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्याचे लक्षात आले. त्यानं यापूर्वी चंद्रपूरमध्ये चोरी केली होती. त्यामुळं त्याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. मयूरनं सगळं खर काय ते सांगितलं, अशी माहिती हुडकेश्वर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी दिली.
17 तोळे सोने हे चार लाख 71 हजार रुपयांचे होते. त्यापैकी चार लाख पन्नास हजारांचे सोने जप्त करण्यात आले. तो माल त्यानं एका ठिकाणी गाळून ठेवला होता. पोलिसांसमोर त्यानं सोने लपवून ठेवलेली जागा दाखविली. सिरभाते यांच्या हार्डवेअरच्या दुकानात मयूर नोकर होता. गेल्या दोन वर्षांपासून काम करत असल्यानं त्याच्यावर सिरभाते कुटुंबीयांचा विश्वास होता. मयूरची पत्नी सिरभाते यांच्या घरी घरकाम करायची. त्यानेचं चोरी केल्याचं स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.
सिरभाते हे एनआयटीत सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यामुळं त्यांनी बायकोला तक्रार करायला लावली असावी, असा संशय आहे. कारण एवढे मोठे सोने कुठून आले, याची चौकशी केल्यास तेही संशयाच्या भोवऱ्यात येऊ शकतात. सोने खरेदी केले ते कुठल्या पैशातून याचा त्यांना जाब विचारल्यास याचा हिशेब देण्यास कठीण जाईल, अशी चर्चा घरच्या बाजूचे करत होते.