Devendra Fadnavis : शिंदे-देवेंद्रची जोडी राज्याला नंबर वन केल्याशिवाय श्वास घेणार नाही; फडणवीसांची नागपुरातून गर्जना
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक महिना आणि पाच दिवस मी नागपूरपासून दूर होतो. एक लढाई सुरू होती. त्यामुळे नागपुरात येता येत नव्हतं. नागपूर आपली कर्मभूमी, जन्मभूमी पुण्य भूमी आणि विचार भूमी आहे.
नागपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra) मनातील गोष्ट वास्तविकतेत उतरविणार आहे. दिवसाची रात्रं आणि रात्रीचा दिवस करून राज्याला एक नंबरचं राज्य बनवल्याशिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्रची जोडी आता श्वास घेणार नाही, अशी गर्जना उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली. शिंदे-फडणवीस जोडी राज्याला नंबर एक करेल, हा विश्वास तुम्हाला देतो, असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री नागपुरात आले. तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या रॅलीला (Rally) संबोधित करताना ते बोलत होते. फडणवीसांनी सांगितलं की, काही लोक म्हणाले हे सरकार सहा महिने चालेल. तुम्हाला आठवत असेल 2014चं सरकार आल्यावर तेव्हा हेच म्हणायचे. वर्षभराच्यावर हे सरकार चालणार नाही असं सांगितलं जात होतं. पण 40 वर्षानंतर पाच वर्ष सरकार पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता आणि भाजपचं सरकार होतं. पुढचे अडीच वर्ष तर पूर्ण करूच. पण पुढच्या पाच वर्षासाठी बहुमताचं सरकार महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही.
प्रेमाचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करेन
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक महिना आणि पाच दिवस मी नागपूरपासून दूर होतो. एक लढाई सुरू होती. त्यामुळे नागपुरात येता येत नव्हतं. नागपूर आपली कर्मभूमी, जन्मभूमी पुण्य भूमी आणि विचार भूमी आहे. त्यामुळे नागपूरमध्ये कधी यायला मिळतं असं वाटत होतं आणि कधी तुम्हाला भेटतो असं वाटत होतं. आज तुम्ही माझा भव्य सत्कार केला. तुमचे आभार कसे मानू हे समजत नव्हतं. पण आपल्या लोकांचे आभार मानायचे नसतात त्यांच्या ऋणात राहायचे असते. मी तुमचा कर्जदार आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमची सेवा करत करत हे प्रेमाचं कर्ज मी फेडण्याचा प्रयत्न करणार आहे.
जनतेच्या कौलानुसार युतीचं सरकार
आता पुढची अडीच वर्ष ही कर्मण्यतेची आहेत. कर्मयोगाची आहेत. या महाराष्ट्राला, विदर्भाला नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करत महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार आहे. तुम्ही आलात तुमचे आभार मानतो. आमचे नेते मोदी, अमित शहा जेपी नड्डा आणि आपले नेते नितीन गडकरी यांचे आभार मानतो, असंही त्यांनी सांगितलं. मोंदीच्या नेतृत्वात राज्य पुढं जात होते. त्याला अनैसर्गिक महाविकास आघाडीच्या सरकारनं खोडा टाकला. आता पुन्हा शिवसेना-भाजपची युती झाली. राज्याच्या जनतेनं दिलेल्या कौलानुसार ही युती झाली. महाविकास आघाडीच्या काळात विदर्भावर अन्याय होत होता. विदर्भाचा निधी पळविला जात होता.