Nagpur Temperature | सूर्य आग ओकतोय, उन्हामुळे वाढले त्वचारोग; कशी घ्याल काळजी?
विदर्भात सूर्य आग ओकतोय. उन्हामुळं त्वचारोग वाढलेत. दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. सुती सैल कपडे घालावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात. एप्रिलमध्ये तापमानात वाढ होत असल्यानं काळजी घेणे एवढेच आपल्या हातात आहे.
नागपूर : विदर्भात सध्या 42, 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलंय. पंधरा मार्चपासून तापमान वाढले. सूर्य आग ओकत आहे. या उन्हामुळं त्वचारोग वाढीस लागले आहेत. मेडिकलच्या त्वचारोग विभागात ( Dermatology) रोज साडेतीनशे रुग्ण येतात. त्यापैकी शंभरच्या वर रुग्ण हे उन्हामुळं त्वचारोगाशी संबंधित असतात. बहुधा दोनशे ते अडीचशे रुग्ण त्वचारोग विभागाच्या ओपीडीत येतात. पण, उन्हामुळं ही संख्या वाढली असल्याचं मेडिकल हॉस्पिटलच्या त्वचा रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयेश मुखी (Dr. Jayesh Mukhi) यांनी सांगितलं. उन्हामुळं त्वचेशी संबंधित अलर्जी होत असते. मार्च आटोपला. एप्रिल सुरू झाला. आता उन्हाचा पारा आणखी हळूहळू वाढेल, असा हवामान खात्याचा (Weather Department) अंदाज आहे. या महिन्यात अॅलर्जीसोबतच फंगल इन्फेक्शन, स्केबिज, दाद, खाज, सनबर्न, ड्रायनेस, लाल चट्टे आदी समस्या निर्माण होतात.
उन्हामुळे या समस्या उद्भवतात
प्रदूषण, फास्ट फुड यामुळंही अॅलर्जीची समस्या उद्भवते. मानेवर, शरीराच्या इतर खुले अवयव प्रथम लाल व नंतर काळे होऊ लागतात. कपडे व बेड शेअरिंगमुळे स्केबिजची समस्या उद्भविते. स्कीन टाईट कापड घातल्याने घाम जातो. यामुळे दाद, खाजेसारख्या समस्या होत असतात. स्वच्छतेच्या अभावामुळेही त्वचेचे आजार होतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही स्कीन ड्रायनेससारख्या समस्यांना अनेकांना तोड द्यावे लागते.
कशी घ्याल काळजी
उन्हाळ्यात दिवसांतून दोनवेळा अंघोळ करण्याचा सल्ला दिला जात आहे. याशिवाय कॉटनचे मोकळे कापड घालावे. वेळीच उपचार न केल्यास त्वचा रोग गतीने पसरतो. त्यामुळं काळजी करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात बाहेर पडून नये. आजाराच्या लक्षणांनुसार काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात. उन्हामुळं काही त्रास झाल्यास मेडिकलच्या त्वचारोग विभागात त्वचेशी संबंधित आजारांवर उपचार केले जातात.