नागपूर : कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात ऑक्टोबरच्या तिसर्या आठवड्यापासून डिसेंबरअखेपर्यंत एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कोरोनाच्या दैनंदिन बाधितांसोबतच मृतांमध्येही टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. हे मृत्यूचे सत्रही गेल्या दोन-तीन दिवसांपासून कायम आहे. त्यामुळं प्रशासनाच्याही चिंतेत भर पडली. शुक्रवार, 14 जानेवारी रोजी जिल्ह्यात तीन कोरोना बळींची नोंद झाली. गुरुवारी एका मृत्यूची (Death) नोंद झाली होती. तर, एक हजार 732 नव्या कोरोना बाधितांचीही भर पडली. पोलीस विभागातील एकूण 122 जण कोरोना संक्रमित झालेत. त्यापैकी 27 जण काल बाधित झाले. बाधित पोलिसांना गृह विलगीकरणात पाठविण्यात आलंय.
शुक्रवारी लक्ष्मीनगर व आसीनगर झोनअंतर्गत दोन वृद्ध व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली. यातील एका रुग्णावर खासगी रुग्णालयात तर एकावर मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू होता. तर नागपूर जिल्ह्याबाहेरीलही एका कोविडबाधित वृद्ध महिलेचा शहरातील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 10 हजार 128 वर गेली आहे. यातील 2 हजार 604 मृत्यू हे नागपूर ग्रामीणमधील, 5 हजार 897 शहरातील तर 1 हजार 627 मृत्यू हे जिल्ह्याबाहेरील आहेत. शुक्रवारी शहरातून 583 व ग्रामीणमधून 89 असे 672 जण ठणठणीत होऊन घरीही परतलेत. सद्यास्थितीत शहरात 6 हजार 866, ग्रामीणमध्ये 1 हजार 388 व जिल्ह्याबाहेरील 106 असे 8 हजार 360 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी लक्षणे असलेले 44 जण मेडिकलमध्ये, 10 जण मेयोत, 47 जण एम्समध्ये तर इतर रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये तसेच लक्षणे नसलेले गृहविलगीकरणात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात तीन हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. विभागातील सक्रिय रुग्णसंख्या 10 हजारावर गेलीय. पण रुग्णालयातील बेड मात्र रिकामे आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत 211 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी 89 रुग्णांना ॲाक्सिजनची गरज नाही, तर 26 रुग्णांना ॲाक्सिजन लावण्यात आलंय. यावरुन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचं प्रमाण कमी आहे. असं आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी सांगितलं. पण लोकांनी कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय.