तिकीट दरात कुठलीही दरवाढ नाही; परिवहन विभागाच्या अर्थसंकल्पात आणखी काय?
वाडी डेपो येथे अंदाजे तीन एकर जागेत अद्ययावत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. जानेवारी २०२३ पासून या सर्व बसेस शहर परिवहन सेवेत कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.
नागपूर : मनपाच्या परिवहन विभागातर्फे २०२२-२३ चा सुधारित व २०२३-२४ चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी मनपा प्रशासक आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवला. यानंतर त्यांनी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सांगितले की, २०२३-२४ च्या वार्षिक अर्थसंकल्प ‘ब’चे उत्पन्न ३५८ कोटी ८७ लाख रुपये अपेक्षित आहे. सुरुवातीची २१ कोटी ४५ लाख रुपये शिल्लकेसह एकूण उत्पन्न ३५९ कोटी ८ लाख रुपये अपेक्षित उत्पन्न गृहित धरण्यात आलं. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३५८ कोटी ८८ लाख रुपये खर्च होतील. मार्च २०२४ अखेर अपेक्षित शिल्लक २० कोटी ३८ लाख राहील. क्ष एवढी राहिल. परिवहन उपक्रमाच्या शहर परिवहन निधीकरिता महसूल राखीव निधी या नावाने स्वतंत्र निधी खाते उघडण्यात आले आहे. याशिवाय परिवहन सुधारणा निधीसुद्धा स्थापन करण्यात आला आहे. मनपाच्या परिवहन सेवेमध्ये सध्या ६१ ईलेक्ट्रिक बसेस, ४५ मिनी बसेस, १५० मिडी व डिझेल आणि सीएनजीवरील २३७ अशा एकूण ४९३ बसेसचा समावेश आहे.
तीन एकर जागेत चार्जिंग स्टेशन
‘फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्यूफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड व्हेईकल’ अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी १०० टक्के ई-बसेसला प्राधान्य देण्याचे धोरण केंद्र शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार नागपूर मनपातर्फे १०० इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात केंद्र शासनाद्वारे मंजुरी प्राप्त झाली. मनपाद्वारे तूर्तास ४० ई-बसेस खरेदीचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मे. इव्ही ट्रान्स प्रा.लि. या कंपनीशी करार केला. नोव्हेंबर २०२२ मध्ये ४० बसेस प्राप्त झाल्या. वाडी डेपो येथे अंदाजे तीन एकर जागेत अद्ययावत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. जानेवारी २०२३ पासून या सर्व बसेस शहर परिवहन सेवेत कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.
या योजनाही लागू राहणार
मनपाच्या परिवहन विभागाला ४० वातानुकूलित ई-बसेस देण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ बस जानेवारी २०२३ मध्ये मनपाला प्राप्त झालेल्या आहेत. यासाठी नियुक्त मे. टाटा मोटर्स लि. कंपनीशी करार झालेला असून कंपनीकडून १५ डी.सी. चार्जर्स इलेक्ट्रिक चार्जिंग यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली असल्याचेही रवींद्र भेलावे यांनी सांगितलं. परिवहन विभागाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कुठलेही भाडेवाढ नाही. याशिवाय सामाजिक दायित्वातून सुरू असलेले उपक्रम सुद्धा सुरू ठेवण्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापकांनी सांगितले. माजी सैनिक, दिव्यांग यांना नि:शुल्क प्रवास, विद्यार्थ्यांना ६६ टक्के आणि ज्येष्ठांना ५० टक्के सवलतीची योजना यावर्षीही सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.
मोरभवन बसस्थानकाच्या विकासाचा मार्ग मोकळा
नागपूर शहरातील मोरभवन बसस्थानकाच्या विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला. मोरभवन बसस्थानकाचे विकासकार्य येथील वृक्षांमुळे रखडले होते. मोरभवन बसस्थानकाच्या विकासाकरिता २०१७ मध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून मनपाला ५ एकर जागा प्राप्त झाली. मात्र येथील वृक्षांच्या प्रश्नामुळे हे कार्य प्रलंबित होते. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वृक्ष प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. परिवहन विभागाद्वारे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिष्ठांना पत्र देऊन त्यांच्या तज्ज्ञांद्वारे सदर जागेवरील पुनर्लागवडीकरिता येण्यायोग्य झाडांचा अहवाल मागवण्यात आला. ही झाडे गोरेवाडा येथे पुनर्लागवड करण्यात येतील. याशिवाय जी झाडे पुनर्लागवड करता येणार नाही ती झाडे तोडून त्या झाडांच्या वयोमानाएवढी वृक्षलागवड परिवहन विभागाद्वारे करण्यात येईल.