नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूच्या गोदामावर धाड टाकली. यात 10 लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला. शिवाय एका आरोपीला अटक केली. पुढील कारवाई अन्न प्रशासन विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
राज्यात सुगंधी तंबाखूवर बंदी आहे. तरी मोठ्या प्रमाणात हा तंबाखू चोरीच्या मार्गाने येतो. त्याची विक्री होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून हे दिसून येते. गुन्हे शाखा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू गोदामात ठेवण्यात आले होते. पोलिसांनी इतवारी परिसरातील गोदामावर धाड टाकत कारवाई केली. त्या ठिकाणी 9 लाख 30 हजार रुपयांचा तंबाखू आढळून आला. तर दुसरीकडे एका दुकानातसुद्धा सुगंधी तंबाखू असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी सुद्धा कारवाई करत काही तंबाखू जप्त केला. एकूण 10 लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे युनीट तीनचे पोलीस निरीक्षक प्रदीप रयनावार यांनी दिली.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. याची किंमत सुमारे नऊ लाख 80 हजार रुपये आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी कैलास सारडा याला अटक केली. तर, लकडगंज पोलीस स्थानक हद्दीत पानविक्री दुकानावर धाड टाकण्यात आली. त्याठिकाणी अडीच हजार रुपये किमतीची साडेचार किलो सुंगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. लकडगंज पोलीस ठाण्या हद्दीत सुहास मांडवगडे याला अटक करण्यात आली आहे. नागपुरात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूची अवैध विक्री केली जाते. त्यामुळं सरकारी टॅक्सचं तर नुकसान होतंच. सोबतच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.