Amravati | थर्टी फर्स्टला मरणापूर्वी तेरवीचा कार्यक्रम; निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं?
एकंदरित हर्षोल्लासात कार्यक्रम झाला. नातेवाईक, मित्रमंडळींना जेवणाचा यथेच्च आनंद घेतला. अशाप्रकारे त्यांचा थर्टी फर्स्ट साजरा झाला नि तेरवीचा कार्यक्रमही...
अमरावती : कोण दिवस येईल कसा कोण जाणतो! आजचा दिवस आपला आहे. उद्याचा आपल्या हातात नाही. हा विचार करून एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं स्वत:च्या तेरवीचा कार्यक्रम जिवंतपणी केला. तेही थर्टी फर्स्टचं निमित्तं साधून. याच कारण जाणून घ्याल तर थक्क व्हालं.
सहकाऱ्यांनी घेतला नाही सेवानिवृत्तीचा आनंद
सुखदेव डबरासे हे अमरावतीतील रहाटगाव येथे राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक. पोलीस दलात असताना 35 वर्षे नोकरी केली. पण, काही सहकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर लवकरच मरण पावले. काही सहकाऱ्यांचा चार-सहा महिने काढले. त्यानंतर त्यांना मृत्यूने जवळ केले. कुणी वर्षभर सेवानिवृत्तीचा आनंद घेतला. पण, तो खरा आनंद नव्हताच. सेवानिवृत्तीनंतर वर्षभरापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याचा अर्थ त्यांनी सेवानिवृत्तीचा आनंद नाही घेतला, असं डबरासे यांना वाटलं.
पत्नी, मुलीचा होता विरोध
डबरासे म्हणतात, मी साडेपाच वर्षांपासून पेन्शनचा आनंद घेत आहे. साठी ओलांडली, तरी उत्साही आहे. मी अजून जिवंत आहे. पण, सहकाऱ्यांसारखा मरणानंतर गेट टुगेदर म्हणजे तेरवीचा कार्यक्रम पाहायला मी नसणार. त्यामुळं जिवंतपणीच हा कार्यक्रम घेण्याचं मी ठरविलं. सहाजिकच असं कुणी करत नाही. त्यामुळं कुटुंबामध्ये नाराजी होती. एका मुलीची या कार्यक्रमाला नाराजी होती. सुरुवातीला पत्नीचीसुद्धा नाराजी होती. पण, त्या दोघींनाही मी माझ्या बुद्धीप्रमाणे समजावून सांगितलं.
पाहुण्यांच्या स्वागतासाठी लावली पाटी
कार्यक्रम तेरवीचा आहे, असं जरी सांगितलं. तरी मी जिवंत आहे. त्यामुळं हा कार्यक्रम आनंदात साजरा करा, हे त्यांना समजलं. त्यामुळं त्याची या कार्यक्रमात सहभागी झाल्यात, असं स्वत:च्या तेरवीचा कार्यक्रम करणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुखदेव डबरासे यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी मित्र-नातेवाईक, शेजारी यांना तेरवीचं स्वतः आमंत्रण दिलं. त्यासाठी त्यांनी पत्रिका छापल्या. त्या वाटप केल्या. घरी पेंडाल उभारला. पूजा केली. येणाऱ्या पाहुण्यांसाठी सेवानिवृत्त श्री डबरासे साहेब आपले सहर्ष स्वागत करीत आहेत, असं त्यांनी घराबाहेर लिहिले. येणाऱ्या प्रत्येकाशी गप्पा मारल्या. एकंदरित हर्षोल्लासात कार्यक्रम झाला. नातेवाईक, मित्रमंडळींना जेवणाचा यथेच्च आनंद घेतला. अशाप्रकारे त्यांचा थर्टी फर्स्ट साजरा झाला नि तेरवीचा कार्यक्रमही…