चार मुलं पोहायला गेले, तीन जण बेपत्ता झाल्याचं एक जण सांगत आला, त्यानंतर…
वर्धा नदीत खेकडे पकडण्यासाठी चार मुलं गेली होती. यापैकी तीन मुलं बुडाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे घडली.
चंद्रपूर : पोहायला गेलेली तीन मुलं वर्धा नदीत बुडाली. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे ही घटना घडली. आज दुपारी चार मुलं वर्धा नदीत पोहायला गेली होती. मात्र त्यातील एक मुलगा गावात परत आला. तीन मित्र वाहून गेल्याचे सांगितलं. गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने शोध सुरू केलाय. नदी पात्रात मुलांचा शोध वृत्त लिहेस्तोवर सुरू होता. ही मुलं खेकडे पकडायला गेल्याचं सांगितलं जातं. बुडालेली सर्व मुलं अंदाजे १० वर्ष वयोगटातील आहेत. प्रतीक जुनघरे, निर्दोष रंगारी, सोनल रायपुरे अशी आहेत बेपत्ता असलेल्या मुलांची नावे आहेत.
चार पैकी एक जण बचावला
गावाजवळील वर्धा नदीत खेकडे पकडण्यासाठी चार मुलं गेली होती. यापैकी तीन मुलं बुडाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे घडली. चार जणांपैकी एक जण वाचल्याने घटना माहीत झाली. घटनेची माहिती मिळताच पालक, गावकरी, पोलीस घटनास्थळी गेले. बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेत आहेत.
खेकडे पकडण्यासाठी गेले
आज दुपारी तोहोगाव येथील प्रतीक नेताजी जुंनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे आणि आरुष प्रकाश चांदेकर सर्व अंदाजे १० ते १२ वर्षे वयोगटाची ही मुलं. चौघे मिळून वर्धा नदीत खेकडे पकडण्यासाठी गेले असल्याचं सांगण्यात आलं.
ही तीन मुलं बेपत्ता
या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. यातील प्रतीक जुंनघरे, निर्दोष रंगारी, सोनल रायपुरे हे खोल पाण्याच्या प्रवाहात बुडाले. आरुष चांदेकर हा स्वतःला बाहेर काढण्यात यशस्वी झाला. तो गावात आला. त्याने पालकांना घडलेली घटना सांगितली.
पोलिसांची शोधमोहीम सुरू
कोठारी, लाठी आणि विरुर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. माहिती मिळताच पालक आणि गावकरी घटनास्थळी पोहचले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.