चिमुकल्यासोबत रस्ते अपघातात जे झालं, एवढं वाईट कुणासोबतंही होवू नये
कुणा-कुणाला भेटणार, याची स्वप्न रंगवत होते. पण, रस्त्यात एक ट्रक काळ बनून आला आणि मोठा घात झाला.
नागपूर : युग हा पाच वर्षांचा बालकं. गावाकडे नातेवाईकांचे लग्न असल्याने तो जाण्यासाठी उत्सुक होता. सोबत बहीणही होती. शिवाय बाबा म्हणाले, परीक्षा संपल्या चल. आपण लग्नाला जाऊन येऊ. निक्की बावणे यांनी दुचाकीवर दोन मुलं आणि आईला सोबत घेतले. निक्की बालाघाटच्या दिशेने निघाले. चौघेही लग्नात काय काय करणार. कशी मजा घेणार. कुणा-कुणाला भेटणार, याची स्वप्न रंगवत होते. पण, रस्त्यात एक ट्रक काळ बनून आला आणि मोठा घात झाला.
जखमी मुलावर उपचार सुरू
नागपूर जिल्ह्याच्या रामटेकजवळील आमडी फाट्यावर शनिवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. बाईकवरून जात असलेल्या आई, वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलगा गंभीर जखमी आहे. मुलावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्गावर वाहनांची मोठी रांग आहे. या फाट्यावर अंडरब्रीजची मागणी होत आहे.
निक्की करायचे मिस्त्री काम
निक्की बावणे हे त्यांची आई भागवंताबाई बावणे (वय ६०) आणि मुलगी इशानी बावने (वय सात वर्षे) आणि मुलगा युग याला घेऊन बालाघाटकडे जात होते. निक्की हे मूळचे बालाघाट जिल्ह्यातील. गेल्या पाच वर्षांपासून कोराडीजवळ गोधनी येथे राहत होते. मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करायचे.
नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने उडवले
नातेवाईकांकडे लग्न असल्याने ते मोटारसायकलने बालाघाटकडे जात होते. आमडी फाटा परिसरात नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिघांचा मृत्यू झाला.
नागरिकांनी केले आंदोलन
युग बाहेर फेकला गेला. त्यामुळे तो जखमी झाला. रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात युगवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. अपघातानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे सुमारे दोन किलोमीटर परिसरात रांग लागली होती. तहसीलदारांनी घटनास्थळ भेट देऊन नागरिकांना शांत केले.
हा चिमुकला आता एकाकी झाला आहे. वडील, आजी आणि बहीण हे तिघेही याला सोडून गेलेत. त्याच्या डोळ्यासमोर हे सर्व घडलं. तोही गंभीर जखमी झाला. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत.