Corona | नागपूरकरांनो काळजी घ्या, पुन्हा कोरोना हातपाय पसरतोय!; ओमिक्रॉनचे तीन नवे बाधित, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 196 नवे रुग्ण
शहरात पुन्हा कोरोना सक्रिय होत आहे. झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संक्रमणाची हीच गती राहिल्यास पुढील दहा दिवसांत बाधितांची संख्या एक हजारांच्या घरात दिसण्याची शक्यता आहे.
नागपूर : नागपुरात कोरोना पुन्हा हातपाय पसरत असल्याचं चित्र आहे. ओमिक्रॉनचे तीन नवे बाधित असल्याची नोंद मंगळवारी झाली. तसेच कोरोना बाधितांचा आकडा काल 133 होता. तो गेल्या 24 तासांत 196 वर पोहचला.
शहरात 166 तर ग्रामीणमध्ये 24 बाधित
शहरात पुन्हा कोरोना सक्रिय होत आहे. झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संक्रमणाची हीच गती राहिल्यास पुढील दहा दिवसांत बाधितांची संख्या एक हजारांच्या घरात दिसण्याची शक्यता आहे. मंगळवारी शहरात 166 बाधितांची नोंद झाली. तर ग्रामीणमध्ये 24 बाधितांची भर पडली. अन्य ६ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. सोमवारी चार ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली होती. मंगळवारी आणखी तीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले.
आता खरी गरज नियम पाळण्याची
एक दिवसापूर्वी बाधितांचे शतक झाले तर दुर्याच दिवशी ही संख्या 196 अर्थात दुहेरी शतकाच्या टोकावर आली आहे. पावणे सात महिन्यानंतर कोरोना पुन्हा सक्रिय झालाय. ही संक्रमणाची गती पहिल्या व दुसर्या लाटेच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक आहे. त्यामुळं आता खर्या अर्थाने नागरिकांनी कटाक्षाने कोविडचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोविड बाधितांची सर्वाधिक संख्या ही 7999 एवढी पोहोचली होती. जुलैमध्ये रुग्णसंख्या तीसच्या खाली आली. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वीसहून कमीच राहिली.
चिमुकल्याची आईही ओमिक्रॉनने बाधित
मंगळवारी जिल्ह्यात एकूण 7008 चाचण्या करण्यात आल्या. दिवसभरात 26 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर 196 रुग्णांची भर पडली. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घटले. हे प्रमाण 97.81 वर आले आहे. दोन दिवसांपूर्वी युगांडा येथून परतलेले आई व मूल दोघेही कोरोनाबाधित आढळले. त्यातील सहा वर्षांचा चिमुकला ओमिक्रॉनच्या विळख्यात अडकला. त्यापाठोपाठ आता आईदेखील ओमिक्रॉनबाधित असल्याचा अहवाल पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला.
ओमिक्रॉनबाधितांची संख्या 13 वर
लक्ष्मीनगर झोनमधील 57 वर्षीय व्यक्ती पूर्व आफ्रिकेतून आली होती. त्यांच्यासह रामटेक तालुक्यातील 27 वर्षीय महिला ओमिक्रॉनबाधित आढळली. दोघेही एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली. मंगळवारी नोंद झालेल्या 196 कोरोनाबाधितांमध्ये शारजाहून परतलेली 44 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे.