गोंदिया : जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक 1 बीट कक्ष क्रमांक 254 बी मध्ये वाघाच्या (tiger) मृतदेह आढळला. मृतक वाघाचे नख आणि दात गायब असल्याने मृतक वाघाची शिकार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळं वन विभागाबरोबरच परिसरात एकच खळबळ माजली आहे. आज सकाळी वनाधिकाऱ्यांद्वारे जंगलात पेट्रोलिंग सुरू असताना संबंधित घटना उघड झाली आहे. अर्जुनी मोरगावपासून दहा किलोमीटर अंतरावर निलज गावालगत दोन किलोमीटर अंतरावर सदर घटना घडली. मृतक वाघाचे नख आणि दांत गायब असल्याने त्याची शिकार (hunting) केल्याची प्राथमिक माहिती आहे.
वनकर्मचारी व वनमजूर सकाळी गस्त घालत होते. मृतावस्थेत वाघ दिसल्यानं त्यांनी ही माहिती उपवनसंरक्षक व संबंधितांना दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांच्यासह वनविभागाचे अधिकारी आणि मानद वन्यजीव संरक्षक मुकुंद धुर्वे, सावन बाहेकर हे घटनास्थळी दाखल झाले. वाघाची दोन दिवसांपूर्वी शिकार झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विद्युत शॉक लावून शिकार करण्यात आली असावी, असेही बोलले जाते. उपस्थित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. वाघाचे शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. आरोपींनी शिकार कश्याप्रकारे केली. यादृष्टीने तपास सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील अशीच शिकारीची घटना घडली. घटना समोर आल्यानंतर अनेक आरोपींना अटक झाली होती. मात्र आजच्या घटनेनंतर ही वनविभागासमोर एक आव्हान उभे ठाकले आहे. वन विभागाद्वारे आरोपीचा शोध सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा असरअली आष्टी चामोर्शी देसाईगंज या तालुक्यात नरभक्षक वाघाने दहशत घातली आहे. मागील एका वर्षात 17 नागरिकांनी या नरभक्षक वाघाने ठार केले. तर आज पुन्हा दोन पाळीव प्राण्यांवर हल्ला करून एक बैल एक गायीला वाघांनी ठार केले. सिरोंचा तालुक्यातील तुमनुर गाव परिसरात आज वाघाने हल्ला करून पाळीव प्राण्यांना ठार केले. याच भागात दीड महिने अगोदर एका शेतकऱ्यांवर हल्ला करून ठार केला होता. या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभाग अपयशी ठरत आहे. या पंधरा दिवसा अगोदर गडचिरोली जिल्ह्यात एक वाघाचा मृत्यू झाला तर एक वाघिणीची तस्कारांनी शिकार केली होती. आता तिसऱ्या वाघाची दहशत गडचिरोली जिल्ह्यात कायमच आहे.