नाव बुडाल्याने नागपूरच्या कुहीत पाच महिला बुडाल्या, एकीचा मृत्यू, तर तिघींची प्रकृती चिंताजनक
नागपूरच्या कुही येथे नावेतून जात असताना नाव उलटून पाच महिला बुडाल्या. या पैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. तर एक महिला बचावली आहे.
नागपूर: नागपूरच्या कुही येथे नावेतून जात असताना नाव उलटून पाच महिला बुडाल्या. या पैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. तर एक महिला बचावली आहे. या घटनेमुळे सदर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील कुही येथे आज सकाळी पाच महिला पाण्यात बुडाल्या. गोसेखुर्दच्या बॅक वॉटरमधून नावेतून जात असताना नाव बुडाल्याने ही दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तीन महिला अत्यवस्थ असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पाचही महिला मिरची तोडणी आणि कापूस वेचणीच्या कामाला जात होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली. ही घटना घडता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.
दीड वर्षाच्या बाळाची आईच दगावली
या दुर्घटनेत गीता रामाजी निंबर्ते यांचा मृत्यू झाला आहे. गीता यांना दीड वर्षाचा मुलगा आहे. घरी मुलगा, पती आणि त्याच होत्या. आता त्यांचा मृत्यू झाल्याने या मुलाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्व महिला मौजा कुजबा येथील असल्याचं सांगितलं जात आहे.
असा झाला अपघात
या पाचही महिला कापूस वेचण्यासाठी आणि मिरची तोडणीसाठी आम नदी ओलांडून जात होत्या. शेतमालक परमानंद तिजारे यांच्या शेतातून त्या नावेने जात होत्या. नदीच्या पात्रात अचानक नाव फुटली. त्यामुळे नावेत पाणी शिरले आणि नाव बुडाली. या महिलांना बचावासाठी आरडोओरड केली. मात्र, त्यांना नागरिक बचावाला जाण्यासाठी जाईपर्यंत नाव बुडाल्याने या महिला गंटागळ्या खात होत्या. त्यातील गीता रामदास निंबारते यांचा मात्र बुडून मृत्यू झाला. मनू सुरेश साळवे, मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी लोमेश्वर गिरी, मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे या चार महिला वाचल्या आहेत. मात्र यातील दोघींवर मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर लक्ष्मी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांच्यावर नागपूर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.
जीवघेणा बॅकवॉटर
दरम्यान, गोसेखुर्दचा बॅकवॉटर येथील नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. यापूर्वीही या बॅकवॉटरमध्ये पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. गावातून बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने या बॅकवॉटरमधूनच जावे लागत आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग बनविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/3sHFQq82Tk#liveupdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2022
संबंधित बातम्या: