मध्य रेल्वेच्या अडीचशेवर रेल्वे गाड्या रुळावर; मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या फुल्ल
रेल्वेपाठोपाठ एस सुरळीत सुरू व्हावी, अशी नागरिकांची इच्छा आहे. परंतु, एसटीचे कर्मचारी आणि सरकार यांच्यात समन्वय कसा साधला जातो. त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत एसटीचा प्रवास सुखकर होईल, असं वाटत नाही.
नागपूर : प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वेचा वापर केला जातो. कोरोनामुळं काही काळ रेल्वे बंद होती. परंतु, आता रेल्वे रुळावर आली आहे. रेल्वेचा प्रवास सुसाट वेगाने सुरू झाला आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) नागपूर विभागातून 262 गाड्या सुसाट सुटल्या आहेत. त्यामुळं लांबचा प्रवास करणारे सुखावले आहेत. विशेषताहा मुंबईकडं जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल्ल (Trains housefull) दिसतात. त्या तुलनेत एसटीचा प्रवास थंडावला आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागणांवर ठाम आहेत. त्यामुळं पाहिजे त्या क्षमतेनं एस अद्याप सुरू व्हायच्या आहेत. याचा परिणाम जवळच्या प्रवासावर होत आहे. खासगी वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. रेल्वेपाठोपाठ एस सुरळीत सुरू व्हावी, अशी नागरिकांची इच्छा आहे. परंतु, एसटीचे कर्मचारी आणि सरकार यांच्यात समन्वय कसा साधला जातो. त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत एसटीचा प्रवास सुखकर होईल, असं वाटत नाही.
फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली
कोरोनामुळं रोजगार हिरावला गेला. त्यामुळं काही प्रवासी रेल्वेतून प्रवास करताना तिकीटच काढत नाहीत. यामुळं रेल्वेच्या महसुलाचे नुकसान होते. रोज दीड हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. जानेवारी महिन्यात आतापर्यंत नागपूर विभागात सुमारे 32 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. अद्याप विभागातील काही पॅसेंजर बंद आहेत. रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर त्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी विजय थूल यांनी दिली. कोरोनाच्या काळात पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, प्रवाशांची ओरड असल्यानं यातील फक्त दहा पॅसेंजर सुरू करण्यात आल्या. नागपूर-अमरावती, नागपूर-वर्धा, नागपूर-भुसावळ, अजनी-काजीपेठ, वर्धा-बल्लारशा या पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळं शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि कामगारांची प्रचंड गैरसोय होत आहे.
या गाड्या आहेत सुरू
नागपूर-अहमदाबाद, नागपूर-कोल्हापूर, नागपूर-अमृतसर, नागपूर-पुणे, अजनी-पुणे, नागपूर-पुणे गरीबरथ, नागपूर-जबलपूर, नागपूर-मुंबई सेवाग्राम, नागपूर-मुंबई दुरांतो या एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मुंबई-गोंदिया, विदर्भ एक्सप्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम या गाड्या फुल्ल आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये वेटिंग करावे लागत आहे.