Two murders | नागपुरात एकाच दिवशी दोन खून! दुपारच्या रागाचा रात्री बदला; दारु पिण्याच्या वादातून खून
पोलिसांनी रात्रीच त्यांचा शोध घेऊन अटक केल्याची माहिती सदरचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी दिली. जय सोमकुंवर आणि भूषण सोमकुवर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
नागपूर : माझ्याकडं का पाहतोस, येवढ्याशा कारणावरून दोघांत दुपारी वाद झाला. लोकांनी तो सोडविला. पण, सदरमध्ये रात्री पुन्हा ते आमनेसामने आले. चाकूने भोसकून अनिकेत तांबे याचा खून करण्यात आला. दुसऱ्या घटनेत, गुमगाव येथे दारुच्या वादातून मित्रांनीच एकाला संपविले.
किरकोड वादातून चाकूहल्ला
नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन अंतर्गत रात्रीच्या वेळी मृतक अनिकेत तांबे (वय २५) हा आपल्या मित्रासोबत कोल्ड्रिंक प्यायला गेला. त्याचवेळी कोल्ड्रिंकच्या दुकानात आरोपी भूषण सोमकुवर हा बसून होता. रागाने माझ्याकडे का पाहिलं यावरून दोघांमध्ये किरकोड वाद झाला. तिथल्या लोकांनी वाद सोडविला. मात्र रात्री 12 च्या नंतर आरोपी आपल्या साथीदारांसह आणि मृतक आपल्या मित्रांसह तिथे पोहचले. त्यांच्यात जोरदार वाद होऊन आरोपीने मृतकावर चाकूने हल्ला केला. यात अनिकेतचा मृत्यू झाला. आरोपी घटना स्थळावरून पळून गेले. मात्र पोलिसांनी रात्रीच त्यांचा शोध घेऊन अटक केल्याची माहिती सदरचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी दिली. जय सोमकुंवर आणि भूषण सोमकुवर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुमगावात पोटावर केले सपासप वार
मला दारू कमी का दिली म्हणून आरोपींनी गुमगावच्या धीरज माकोडे या तरुणाचा खून केला. या प्रकरणी धीरज मिश्रा, स्वप्नील डेकाटे, श्रीराम ढोले, क्रिष्णा मेंडुले, जितेंद्र ढोले सर्व राहणार गुमगाव व सातगावचा राजकुमार डेरकर यांना हिंगणा पोलिसांनी अटक केली. घटनेतील मुख्य आरोपी मंगेश टोंगे हा फरार आहे. धीरजचे गुमगावला चिकन सेंटर आहे. सर्व आरोपी हे त्याचे मित्र आहेत. सर्वांनी ओली पार्टी करायचे ठरवले होते. गुमगाव शेतशिवारात सायंकाळी सर्व दारू व मटण घेऊन गेले. धीरज माकोडेला काही काम असल्याने बुटीबोरीला गेला होता. इकडे उर्वरित सर्व मित्रांनी जेवण शिजविण्यास व सोबतच दारू पिण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा धीरज तिथे पोहोचला. त्यावेळी दारू कमी उरली होती. उरलेली दारू तो एकटाच पीत असताना मंगेशने त्याला स्वतःसाठी एक पेग मागितला. यावरून वाद सुरू झाला. हाणामारीत तिथेच पडलेल्या तीक्ष्ण हत्याराने मंगेशने धीरजच्या पोटावर वार केला. यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. काही आरोपीही हा प्रकार पाहून पळून गेले. श्रीराम ढोले, क्रिष्णा मेंडुले, जितेंद्र यांनी जखमीला मेडिकलला नेले. मात्र, डॉक्टरांनी धीरजला मृत घोषित केले.